अन् इमारत बांधूनच ते ग्रामपंचायतीत गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:36+5:302021-03-20T04:30:36+5:30
असगोली : एका कार्यक्रमानिमित्ताने जामसूत गावामध्ये आलो असताना काही ग्रामस्थांनी मला जवळच आणि रस्त्यालगत आमची ग्रामपंचायत असून, तिथे ...

अन् इमारत बांधूनच ते ग्रामपंचायतीत गेले
असगोली : एका कार्यक्रमानिमित्ताने जामसूत गावामध्ये आलो असताना काही ग्रामस्थांनी मला जवळच आणि रस्त्यालगत आमची ग्रामपंचायत असून, तिथे येण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहास्तव तिथे पोहोचलो, परंतु ग्रामपंचायत इमारत कुठेही दिसत नव्हती. खोपटापेक्षाही वाईट अवस्था असलेल्या झोपडीत ग्रामपंचायत कार्यालय होते. ग्रामस्थ मला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चला म्हणाले. त्यावेळी ‘तुमची ग्रामपंचायत नवीन बांधून देईन व मगच मी कार्यालयात पाऊल ठेवेन’, असे वचन मी दिले होते. त्यानंतर यासाठी तत्काळ निधी मंजूर केला आणि ग्रामपंचायतीच्या नवीन वास्तूचे लोकार्पण होताना आपल्याला वचनपूर्तीचा आनंद होत आहे, असे उद्गार आमदार भास्कर जाधव यांनी काढले.
गुहागर तालुक्यातील जामसूत ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तालुक्यात अनेक कामे मंजूर झाली आहेत, परंतु काहींनी ती जाणीवपूर्वक रखडवून ठेवली आहेत. कामे घ्यायची, पण ती जाणीवपूर्वक पूर्ण करायची नाहीत आणि तसे करून लोकांचे आमदारांविषयीचे मत वाईट करायचे, हा त्यांचा हेतू आहे. या ग्रामपंचायतीचे कामही अशाच प्रवृत्तीच्या ठेकेदाराने घेतले होते. परंतु, काम सुरू करण्याऐवजी तो ते सोडायच्या मार्गावर लागला. त्यामुळे या ठेकेदाराला काढून दुसरा ठेकेदार नेमण्यात वेळ गेला आणि इमारतीचे काम पूर्ण व्हायला दोन वर्ष गेली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. पिंपर धरणातून पाणी आणून योजना राबविण्याचा आपण प्रयत्न केला. परंतु, भाजप सरकारने एकही पाणी योजना मंजूर केली नाही. मात्र, आता आपले सरकार आल्यानंतर जलजीवन मिशन योजनेमध्ये जामसूत गावाचा समावेश केला आहे. तुम्ही परिपूर्ण प्रस्ताव करा, तत्काळ पाणी योजना करू आणि गावाला पाणी देऊ, असे ते म्हणाले.
सरपंच बाबू सावंत यांनी आमदार जाधव यांचे आभार मानले. यावेळी पंचायत समिती सभापती पूर्वी निमूणकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा खेतले, उपसभापती सुनील पवार, विनायक मुळे, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, प्रवीण ओक, पंचायत समिती सदस्य सीताराम ठोंबरे, उपसरपंच सृष्टी रेवाळे, माजी सरपंच किशोर साळवी, विश्वनाथ साळवी, नीलिमा साळवी, वनिता डिंगणकर, सतीश मोरे, शैलेश साळवी, महेश जामसूतकर उपस्थित होते. माजी सरपंच सखाराम शिरकर यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.
..................
फोटो आहे. असगोली फोल्डर