रत्नदुर्ग किल्ल्यावर सापडले आफ्रिकन पटखेळाचे कातळशिल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:54 IST2024-11-07T18:53:48+5:302024-11-07T18:54:31+5:30
रत्नागिरी : शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथे साफसफाईवेळी आफ्रिकेमधील पारंपरिक पटखेळातील प्रकार मंकाळा खेळाचे कातळशिल्प आढळले आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे ...

रत्नदुर्ग किल्ल्यावर सापडले आफ्रिकन पटखेळाचे कातळशिल्प
रत्नागिरी : शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथे साफसफाईवेळी आफ्रिकेमधील पारंपरिक पटखेळातील प्रकार मंकाळा खेळाचे कातळशिल्प आढळले आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रत्नदुर्ग किल्ल्यावर साफसफाई करताना दीपगृह परिसरात हे शिल्प आढळल्याचे संशोधन अभ्यासक स्नेहल बने यांनी सांगितले.
हे पटखेळाचे चिन्ह सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वीचे असून, प्रथमच असे रत्नदुर्ग किल्ल्यावर दिसल्याचा दावा बने यांनी केला आहे. मंकाळा हा आफ्रिकन लोकांमध्ये खेळला जाणारा पटखेळ आहे. कातळावर गोल आकाराचे खड्डे एका रांगेत हव्या असलेल्या पटांची संख्येमध्ये कोरून दोन सवंगड्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. भारतात अनेक ठिकाणी याला गायचारा, पलंगुळी, अलगुळी आदी नावाने ओळखले जाते. तसेच खेळ सापडलेल्या ठिकाणी शिवपिंडीसारख्या आकाराचे दोन शिल्पही दिसली आहेत.
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्याचे बालेदार तन्मय जाधव व सक्षम शिंदे यांचीही मोलाची मदत झाली, असे स्नेहल बने यांनी सांगितले.
रत्नदुर्ग किल्ला परिसरातील आढळलेले मंकाळा पटखेळ १ फूट ९ इंच लांब असून, त्यावर १२ पट आहेत तर शिवपिंडी १ फूट लांब व ८ इंच रूंद आहेत. तसेच या ठिकाणी एक पूर्ण वर्तुळ असून, दुसऱ्या वर्तुळाच्या मध्यभागी रेषा असलेली तीन चिन्ह एकाच कातळावर कोरलेली दिसतात.
संशोधन होणे गरजेचे
मंकाळा पटखेळाची आढळलेली चिन्हे आफ्रिकन आहेत. त्यामुळे त्याकाळी आफ्रिकन प्रजातीचे लोक भारतात व्यापारासाठी व जलमार्गाने आले होते का, याबाबत अधिक संशोधन करणे गरजेचे असल्याचेही बने यांनी सांगितले.