जिल्ह्यात नव्याने २० रुग्णांची भर; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:42+5:302021-03-20T04:30:42+5:30
रत्नागिरी : गेल्या २४ तासात जिल्ह्यात नव्याने २० कोरोना रुग्णांची भर पडली असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ...

जिल्ह्यात नव्याने २० रुग्णांची भर; एकाचा मृत्यू
रत्नागिरी : गेल्या २४ तासात जिल्ह्यात नव्याने २० कोरोना रुग्णांची भर पडली असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १०३१८ झाली असून ३७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ६५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर कोरोनामुक्त झालेल्या १९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात काेरोना रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. शिमगोत्सवात ही संख्या अधिक वाढण्याचा धोका आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली असून मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनासमोर पेच उभा राहिला आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात २० जण कोरोनाबाधित झाले. यात आरटीपीसीआर चाचणी १६, तर रॅपिड अँटिजेन चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या ४ जणांचा समावेश आहे. रत्नागिरीतील ९, चिपळूण आणि खेड या तालुक्यांत प्रत्येकी ४, दापोली २ आणि लांजा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत १२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ५५ जण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत.
आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये १०,३१८ रुग्ण पाॅझिटिव्ह आले असून ९०,८२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ९७९१ रुग्ण (९४.८९ टक्के) बरे होऊन घरी गेले आहेत, तर ३७१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.