खेडशी येथील खून प्रकरणातील आरोपीला एक वर्षाने अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:46 IST2020-10-01T17:43:50+5:302020-10-01T17:46:11+5:30
Khedshi murder case, Accused arrested, ratnagiri, police रत्नागिरी शहराजवळील खेडशी गावातील मैथिली प्रवीण गवाणकर या सोळा वर्षीय तरुणीच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक वर्षानंतर नीलेश उर्फ ऊक्कु प्रभाकर नागवेकर (३५) याला अटक केली आहे.

खेडशी येथील खून प्रकरणातील आरोपीला एक वर्षाने अटक
रत्नागिरी : शहराजवळील खेडशी गावातील मैथिली प्रवीण गवाणकर या सोळा वर्षीय तरुणीच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक वर्षानंतर नीलेश उर्फ ऊक्कु प्रभाकर नागवेकर (३५) याला अटक केली आहे.
गतवर्षी ऑगस्टमध्ये मोडा जंगलांमध्ये मैथिली हिचा खून झाला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपीचा सुगावा लागत नव्हता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासात यश आले असून, या खुनामागचे कारण लवकरच पुढे येणार आहे.
मैथिली गवाणकर ही मोडा जंगलांमध्ये बकऱ्या चरविण्यासाठी गेली असता कोणीतरी अज्ञाताने डोक्यात जड वस्तूने मारून तिला ठार मारले होते. हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आल्यानंतर पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी याप्रकरणी पोलीस पथके तयार करून त्यांना सूचना दिल्या होत्या. गुन्हा दाखल करून एक वर्षाचा कालावधी होऊनही आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने तरीही खेडशी गावातील स्थानिक लोकांशी संपर्क व जवळीक साधून गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतला. त्यानंतर खेडशी भंडारवाडी येथील राहणारा नीलेश उर्फ ऊक्कु प्रभाकर नागवेकर याला अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, सहाय्यक पोलीस फौजदार तानाजी मोरे, पांडुरंग गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत बोरकर, राजू भुजबळराव, मिलिंद कदम, सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, अपूर्वा बापट, चालक संजय जाधव, पोलीस नाईक अरुण चाळके, रमीझ शेख, अमोल भोसले, बाळू पालकर, गुरू महाडिक यांनी पार पाडली.