कामथेतील नवविवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू, मुंबई-गोवा महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 16:14 IST2020-12-18T16:14:06+5:302020-12-18T16:14:30+5:30
Accident : कामथे घाटातील अवघड वळणावर बाजू काढत असताना डंपरची धडक बसली. या अपघातानंतर काही वेळातच कामथे येथील ग्रामस्थांची गर्दी झाली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण बनले होते.

कामथेतील नवविवाहित तरुणाचा अपघाती मृत्यू, मुंबई-गोवा महामार्गावरील घटना
चिपळूण : चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात कामथे (ता. चिपळूण) येथील स्वप्नील बुदर (२७, रा. हरेकरवाडी - कामथे) या नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मुंबई - गोवा महामार्गावरील कामथे घाटातील वांगी पुलाजवळ घडला. हा तरुण महावितरण कंपनीच्या एजन्सीजचा कर्मचारी होता.
कामथे घाटातील अवघड वळणावर बाजू काढत असताना डंपरची धडक बसली. या अपघातानंतर काही वेळातच कामथे येथील ग्रामस्थांची गर्दी झाली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण बनले होते. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण आणले. स्वप्नील बुदर याला तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातही ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
स्वप्नील बुदर याचे महिनाभरपूर्वीच विवाह झाला आहे. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर स्वप्नीलचा अपघाती मृत्यू झाल्याने बुदर कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई व भाऊ असा परिवार आहे.