विनोद पवार
राजापूर : सांगलीहून राजापूरकडे निघालेल्या एसटी बसचा अणस्कुरा घाटात ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. चालक एस. आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या दिशेने घातल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. अन् ५० प्रवाशांचा जीव वाचला. अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. आज, सोमवारी सकाळी १०.३० वाजता ही घटना घडली. चालक कुर्णे हे राजापूर-सांगली बस क्रमांक (एम.एच.१४-बी.टी.-२९७५) घेवून सांगली येथुन सकाळी ६.३० वाजता रवाना झाले होते. अणस्कुरा घाटात अचानक एसटी बसचा ब्रेक निकामी झाला. ही बास चालकाच्या निदर्शनास येताच त्यांनी अत्यंत सावधगिरीने बस डोंगराच्या दिशेने वळवली. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला.बसमध्ये ५० प्रवासी होते. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. गाडीत राजापूर पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व पाचल तलाठी सतीश शिंदे हे देखील प्रवास करीत होते. चालक कुर्णे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.