गणपतीपुळे येथे तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश; गेल्या पंधरा दिवसांतील तिसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:21 IST2025-11-08T15:21:00+5:302025-11-08T15:21:24+5:30
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रामध्ये बुडून मुंबई येथील पर्यटक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ७ ...

गणपतीपुळे येथे तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश; गेल्या पंधरा दिवसांतील तिसरी घटना
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रामध्ये बुडून मुंबई येथील पर्यटक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ७ रोजी घडली. त्याच्यासोबतच्या त्याच्या दोन मित्रांना वाचवण्यात स्थानिक ग्रामस्थ, जीवरक्षक तसेच मोरया वॉटर स्पोर्टच्या कर्मचाऱ्यांना यश आले. प्रफुल्ल त्रिमुखी असे या मृत तरुणाचे नाव आहे. पर्यटकाचा बुडून मृत्यू हाेण्याची गेल्या पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे.
दिवाळी हंगामामध्ये येथे दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यातील पेण येथील पर्यटकाचा अजूनही शोध लागलेला नाही. या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी मुंबई येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे पाच मित्र पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले. येथील एका लॉजमध्ये ते थांबले. यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते स्नानासाठी समुद्रात उतरले. आदर्श धनगर (गोवंडी मुंबई), प्रफुल्ल त्रिमुखी (२६, मानखुर्द मुंबई), सिद्धेश काजवे (परळ लालबाग, मुंबई), भीमराज काळे (२४, कल्याण मुंबई), विवेक शेलार (२२, विद्याविहार मुंबई) अशी त्यांची नावे आहेत.
समुद्रात स्नान करताना यातील तिघे जण बुडू लागले. मोठा आरडाओरडा झाल्याने स्थानिक ग्रामस्थ, जीवरक्षक आणि मोरया स्पोर्टच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. श्री देव गणपतीपुळे संस्थानच्या रुग्णवाहिकेने तसेच गणपतीपुळे पोलिसांच्या गाडीने त्यांना तत्काळ मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार व डॉ. अमोल पणकुटे यांनी त्यांना तपासले असता प्रफुल्ल त्रिमुखी याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी घोषित केले. भीमराज काळे व विवेक शेलार या दोघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
पोलिसांनी प्रफुल्ल याच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. प्रफुल्लचा मृतदेह विच्छेदनासाठी खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात येणार आहे. याबाबत अधिक तपास जयगडचे पोलिस निरीक्षक संजय पाटील करत आहेत.