गणपतीपुळे : ट्रकने दुचाकीला धडक देऊन दुचाकी सुमारे दीड किलोमीटर फरफटत नेली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी रत्नागिरी - निवळी - जयगड मार्गावरील चाफे येथे घडली. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक जाळून टाकला.खंडाळा - चाफेरी येथील किरण पागडे हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला गाडीच्या कामासाठी मांजरे फाटा येथे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी चाफे पेट्रोल पंपाच्या पुढील वळणावर अचानक वेगाने आलेल्या आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, ते दुचाकीसह टेम्पोच्या चाकात अडकले. टेम्पोचे मागचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.टेम्पोच्या चाकात गाडी अडकल्यानंतरही चालकाने टेम्पो तसाच सुमारे दीड किलोमीटर चालवत नेला. टेम्पो चालक पळ काढत असल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी टेम्पोचा पाठलाग करुन तो थांबवला आणि त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी टेम्पो पेटवून दिला.या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.
Ratnagiri: टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले, संतप्त ग्रामस्थांनी जाळला टेम्पो
By अरुण आडिवरेकर | Updated: April 1, 2025 14:22 IST