दोन दिवसात मालक स्वतःच नौका हलवणार, मिरकरवाडा बंदराला पोलिस छावणीचे स्वरुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:18 IST2025-05-17T15:18:04+5:302025-05-17T15:18:44+5:30
रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरातील जेटीवर चुकीच्या पद्धतीने शाकारून ठेवलेल्या मच्छीमार नौका तेथून हलविण्यासाठी मिरकरवाडा प्राधिकरणाचे पथक पोलिस बंदोबस्तात ...

दोन दिवसात मालक स्वतःच नौका हलवणार, मिरकरवाडा बंदराला पोलिस छावणीचे स्वरुप
रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरातील जेटीवर चुकीच्या पद्धतीने शाकारून ठेवलेल्या मच्छीमार नौका तेथून हलविण्यासाठी मिरकरवाडा प्राधिकरणाचे पथक पोलिस बंदोबस्तात बंदरावर आले. परंतु शुक्रवारी सर्वच नौका बंद असतात. त्यामुळे जेटीवर शाकारलेल्या नौकांच्या मागे इतर अनेक नौका उभ्या होत्या. त्यामुळे शाकारून ठेवलेली एकही नौका हलवता आली नाही. मात्र शाकारून ठेवलेल्या नौकांच्या माालकांनी पुढील दोन दिवसात आपल्या नौका हलवतो असे सांगितले आहे.
काही मच्छीमार नौकांची १० मे पासूनच मासेमारी बंद झाली आहे. मासेमारी बंद झालेल्या या नौका मिरकरवाडा बंदरातील जेटीवर प्लास्टिक कापड आच्छादून उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. या शाकारलेल्या नौकांमुळे समुद्रात मासेमारी करून बंदरात परतणाऱ्या नौकांना अडचण होऊ लागली. त्यांच्या नौकांवरील मासळी उतरविणे व साहित्य नौकांमध्ये चढविणे जिकिरीचे होऊन गेले. त्यामुळे सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा प्राधिकरणाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली.
मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाच्या मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांनी या नौकांच्या मालकांना नोटीस बजावून त्या नौकांचा इतर नौकांना अडथळा होणार नाही अशा ठिकाणी उभ्या करण्यास सांगितले. परंतु या नौकामालकांकडून नोटीसला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात शाकारलेल्या नौका हटविण्याचे नियोजन झाले.
मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर, परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा रक्षक, होमगार्ड आणि पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली.
शाकारून ठेवलेल्या नौका मालकांना बोलावून त्यांच्या नौका जेटीवरून हलवून दुसरीकडे उभ्या करण्यास सांगितले. ही कार्यवाही न झाल्यास फौजदारी कारवाईसह नौकांच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार नाही असा इशाराही मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
मालकांचे आश्वासन
शुक्रवार असल्याने नौकांची मासेमारी बंद असल्याने या सर्व नौका बंदरात उभ्या होत्या. त्यामुळे शाकारलेल्या नौका सुरू करून दुसरीकडे नेणे शक्य नव्हते. त्यामुळे या नौकामालकांनी पुढील दोन दिवसात नौका हलवण्याचे आश्वासन दिले आहे.