भरधाव कार थेट दुकानात घुसली, एक जण जखमी; चिपळुणातील घटना
By संदीप बांद्रे | Updated: June 10, 2023 16:58 IST2023-06-10T16:58:14+5:302023-06-10T16:58:36+5:30
दुकानातील फर्निचर व दर्शनी भागातील मालाचे तसेच कारचे मोठे नुकसान

भरधाव कार थेट दुकानात घुसली, एक जण जखमी; चिपळुणातील घटना
चिपळूण : शहरातील मार्कंडी येथील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या फॅमिली स्टोअर्स या दुकानात वेगाने आलेली कार घुसली. या घटनेत दुकानासह कारचे मोठे नुकसान झाले असून, एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना काल, शुक्रवारी (९ जून) घडली.
शहरातील बहादूर शेख नाक्याहून चिंच नाक्याकडे वॅगन-आर कार घेऊन येत असताना हा अपघात घडला. कारचालकाचा ताबा सुटल्याने तो विरुद्ध बाजूला गेला. त्यानंतर मार्कंडी येथे चौकातील फॅमिली स्टोअर्सकडे गाडी अचानक वळली. त्यानंतरही गाडीवर नियंत्रण न राहिल्याने गाडी थेट दुकानातच घुसली. यामध्ये दुकानातील फर्निचर व दर्शनी भागातील मालाचे नुकसान झाले.
तसेच दुकानासमोर उभ्या असलेल्या एका तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. तसेच अपघातग्रस्त कारचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर मार्कंडी चौक परिसरात नागरिकांनी गर्दी केली हाेती.