Ratnagiri News: भरणेत दुर्मीळ व्हिटेकर बोआ जातीचा साप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 16:38 IST2022-12-30T16:37:40+5:302022-12-30T16:38:19+5:30
१९९१ मध्ये सर्प संशोधक इंद्रनील दास यांनी नवीन प्रजाती म्हणून शोध लावला.

Ratnagiri News: भरणेत दुर्मीळ व्हिटेकर बोआ जातीचा साप
खेड : तालुक्यातील भरणेनाका येथे एका घरामध्ये मंगळवारी (२७ रोजी) रात्री १० वाजता साप आढळला. हा साप दुर्मीळ असणाऱ्या व्हिटेकर बोआ जातीचा असल्याची माहिती कोल्हापूरमधील प्राणीमित्र व वन्यजीव अभ्यासक आशुतोष सूर्यवंशी यांनी दिली.
भरणे येथे एका घरात साप असल्याची माहिती छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या प्राणीमित्रांना मिळाली. सर्पमित्र युवराज मोरे यांनी त्या सापाला सुरक्षितरित्या पकडले. मात्र, या सापामध्ये काही वेगळेपणा जाणवल्याने युवराज मोरे यांनी कोल्हापूर येथील वन्यजीव अभ्यासक आशुतोष सूर्यवंशी यांना माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा साप व्हिटेकरी बोआ जातीचा असून, १९९१ मध्ये सर्प संशोधक इंद्रनील दास यांनी नवीन प्रजाती म्हणून शोध लावला.
भारतीय उपखंडातील हर्पेटाॅलाॅजीमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे रोमुलस व्हिटेकर यांचे नाव या प्रजातीस दिले गेले. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सापांच्या संशोधनामध्ये घालवले त्यांच्या नावाने हा साप ओळखला जावा म्हणून यांच्या गौरवार्थ या सापाला त्यांचे नाव देण्यात आले, म्हणून त्याला व्हिटेकरी बोआ असे म्हणतात.
वनविभागाचे वनक्षेत्रपाल वैभव बोराटे व वनपाल सुरेश उपरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. मानवी वस्तीमध्ये दाखल झालेले किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास लोकांनी याबाबत तत्काळ माहिती देण्याकरता वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे यांनी केले आहे.