खेडमध्ये पोलिस असल्याची बतावणी करत व्यावसायिकाला २ लाखाला लुटले
By अरुण आडिवरेकर | Updated: November 14, 2023 16:43 IST2023-11-14T16:42:56+5:302023-11-14T16:43:33+5:30
हा प्रकार साेमवारी (१३ नाेव्हेंबर) सकाळी ११ वाजता खेडमधील महाडनाका गाेळीबार मैदानासमाेर घडला.

खेडमध्ये पोलिस असल्याची बतावणी करत व्यावसायिकाला २ लाखाला लुटले
खेड : पाेलिस असल्याचे सांगून ‘आमच्या साहेबांनी गाड्या तपासायला सांगितले आहे. कालपासून आम्ही दाेन लाखाचा माल पकडला आहे,’ असे भासवून खेडमधील एका व्यावसायिकाचा तब्बल दाेन लाख ३० हजाराचा साेन्याचा ऐवज लुटला. हा प्रकार साेमवारी (१३ नाेव्हेंबर) सकाळी ११ वाजता खेडमधील महाडनाका गाेळीबार मैदानासमाेर घडला.
शहरातील शिवतर रोड या ठिकाणी राहणारे राजन सहदेव दळवी (६८) हे मंडप व्यावसायिक आहेत. साेमवारी सकाळी ते खेड येथून भरणे येथे मुलाच्या दुकानात जात हाेते. महाड नाका येथील गतिरोधकाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याचे सांगून त्यांची गाडी थांबवली. 'साहेबांनी आम्हाला तपासणी करायला सांगितलं आहे,' असे बोलून त्यांनी दळवी यांच्या जवळील मोबाइल, डायरी, सोन्याचे ब्रेसलेट तसेच गळ्यातील सोन्याची गोफ घेऊन एका पिशवीमध्ये टाकली. ही पिशवी परत देताना दुसरी पिशवी त्यांना दिली.
थोड्या वेळाने दळवी यांनी पिशवी उघडून पाहिली असता त्यात दागिने नव्हते. आपण फसल्याचे समजताच त्यांनी थेट पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी खेड पाेलिस स्थानकात दाेन अज्ञात व्यक्तींविराेधात साेमवारी उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.