रत्नागिरी : नैसर्गिक संकटातून वाचलेला आंबा मार्चपासून वाशी बाजारपेठेत पाठविण्यास सुरुवात झाली. गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली. सोमवारी बाजारात १ लाख १३ हजार इतक्या आंबा पेट्या दाखल झाल्या हाेत्या.
त्यामध्ये कोकणातून या हंगामातील सर्वाधिक ८० हजार, तर अन्य राज्यांतील ३३ हजार पेट्या होत्या. मंगळवारी कोकणातून ६५ हजार आंबा पेट्या विक्रीला पाठविण्यात आल्या होत्या.यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याने दर टिकून राहणे अपेक्षित होते. गतवर्षी या हंगामात ८० हजार ते ९५ हजार इतक्या आंब्याच्या पेट्या पाठविण्यात आल्या होत्या. त्याला १००० ते ३५०० रुपये इतका दर होता.
यावर्षी सोमवारी ८० हजार पेट्या आंबे पाठविण्यात आले. यावर्षीच्या या उच्चांकी आंबा पेट्या ठरल्या आहेत. तसेच मंगळवारी ६५ हजार आंबा पेट्या पाठविण्यात आल्या. या पेट्यांना १००० ते ३५०० रुपये इतकाच दर मिळाला आहे.
सध्याचे बाजारभाव इतके कमी आहेत की, खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात आणण्यासाठी केलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. आंबा पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत सापडले आहेत. यावर्षी आंबा उत्पादन कमी असताना, दरही समाधानकारक नाही. - राजन कदम, बागायतदार