रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील ४२ पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरूप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात सातत्याने आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे.पहलगाम येथील बैसरन खोरे परिसरात मंगळवार, २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील अनेक पर्यटक जम्मू-काश्मीर येथे गेलेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने त्यांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. रत्नागिरीतील साक्षी संदीप पावसकर (२६) आणि रुचा प्रमोद खेडेकर (२१) या सिंधुदुर्गातील सहा नातेवाइकांसोबत २० एप्रिलला काश्मीर येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. २३ रोजी रात्री त्या मुंबईत आल्या.रत्नागिरीनजीकच्या शिरगाव येथील खलिफ मुकादम व सहा कुटुंब सदस्य २० रोजी ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. हे सर्व पर्यटक श्रीनगर येथे हॉटेलमध्ये सुखरूप असून, दि. २५ एप्रिल रोजी विमानाने परतीचा प्रवास करणार आहेत.रत्नागिरी येथील मनोज जठार, अनुश्री जठार व इतर ३२, असे एकूण ३४ सदस्य २१ रोजी ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत रत्नागिरीमधून काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. सर्व पर्यटक कतार, जम्मू येथे सुखरूप आहेत. २४ एप्रिल रोजी ते रेल्वेने दिल्लीत येणार असून, २६ एप्रिल रोजी रत्नागिरीत पोहोचणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षामधून सर्व पर्यटकांशी संपर्क झाला असून, ते सर्व जण सुखरूप आणि सुरक्षित आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने पर्यटकांशी संपर्कपहलगाम येथील हल्ल्याबाबत मंगळवारी जिल्हा नियंत्रण कक्षात वृत्त धडकताच लागलीच सर्वत्र संपर्क सुरू झाला. ज्यांचे नातेवाईक पर्यटनासाठी तिकडे गेले होते, त्यांची नावे कळवावीत, असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स कंपनींना फोन करून त्यांच्याकडून गेलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांची नावे व ते कुठे आहेत, ही सर्व माहिती घेतली जात होती. बुधवारीही जिल्हा नियंत्रण कक्षाकडून श्रीनगर येथील प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.