देवरुख : अंधाराचा फायदा घेत रात्री उशिरा गुटखा विक्रीसाठी नेणाऱ्या गुटखामाफियांच्या तब्बल ३२ किलाेमीटरपर्यंत पाठलाग करून देवरुख पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई साेमवारी मध्यरात्री २:५५ वाजण्याच्या सुमारास मुंबई - गाेवा महामार्गावरील हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे करण्यात आली. या कारवाईत पाेलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले असून, ४ लाख ४१ हजार ५० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.ही कारवाई देवरुखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आली. याबाबतची फिर्याद पोलिस चालक प्रशांत साळुंखे यांनी दिली आहे. सोमवारी मध्यरात्री २:५५च्या सुमारास पोलिस गस्त घालत असताना दाभोळे येथे कोल्हापुरातून रत्नागिरीकडे जाणारी चारचाकी (एमएच ०८ आर ८२९५) गाडी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस चौकशीसाठी जवळ गेल्यावर चालकाने गाडी वेगात पळवली. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनीही पाठलाग सुरू केला. त्याचवेळी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
त्यानंतर हातखंबा येथे नाकाबंदी करुन पोलिसांनी ही गाडी थांबवली. देवरुख पाेलिस ३२ किलाेमीटरचा पाठलाग करत हातखंबा येथे दाखल झाले. त्यानंतर गाडीची तपासणी करण्यात आली. या तपासणीत विक्रीसाठी असलेला बेकायदेशीर गुटखा सापडला. पाेलिसांनी ४ लाख ४१ हजार ५० रुपयांचा गुटखा आणि ५ लाखांची गाडी असा एकूण ९ लाख ४१ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चाैघे देवरुख पाेलिसांच्या ताब्यातदेवरुख पाेलिसांनी मुबीन अशरफ मेमन (वय १९), तायरा अशरफ मेमन (वय ५०), अशरफ हाजी दाऊद मेमन (वय ५२, तिघे रा. झारणी राेड, मच्छी मार्केट, रत्नागिरी) आणि अब्बास इरफान जुन्नानी (वय २०, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) या चाैघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर देवरुख पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.