रत्नागिरी जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायती टीबीमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:44 IST2025-04-10T18:43:24+5:302025-04-10T18:44:48+5:30
लवकरच होणार सन्मान, क्षयरोग निर्मूलन उपक्रमाला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायती टीबीमुक्त
रहिम दलाल
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी २१४ ग्रामपंचायती आता टीबीमुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने देशाला टीबीमुक्त करण्याचे धोरण आखले असून, रत्नागिरी जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी वार्षिक एक हजार लोकसंख्येमध्ये कमीत कमी ३० टीबी संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्या थुंकी नमुन्याची तपासणी करण्यात आली.
तसेच १०० टक्के निक्षय पोषण योजना व पोषण आहार दिलेला असावा, असे विविध निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायती टीबीमुक्त म्हणून पात्र ठरल्या आहेत.
सुवर्ण प्रमाणपत्र
टीबीमुक्त ग्रामपंचायत उपक्रमामध्ये पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्य, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि सलग तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
शासनाचा खासगी रुग्णालयांशी करार
जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये थुंकी तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर संशयित रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येते. तसेच काही खासगी रुग्णालयांशीही शासनाने करार केला आहे. त्यामध्ये मोफत एक्स-रे काढण्यात येतात, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली.
जिल्ह्यात शोधमोहिमेत आढळले ५१० क्षयरुग्ण
क्षयरुग्ण जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ३११ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये ३ हजार ३५५ संशयित क्षयरुग्ण शोधण्यात आले. त्यांच्या थुंकीची तपासणी करण्यात आली तसेच एक्स-रे काढण्यात आले. त्यामध्ये ४२ क्षयरुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण ५१० क्षयरुग्ण आहेत.
क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत म्हणजे नक्की काय ?
गावामधून क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान हे अभियान आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये १ हजार लोकसंख्येच्या प्रमाणात १ क्षयरोग रुग्ण किंवा त्यापेक्षा कमी म्हणजेच अजिबात रुग्ण नसलेल्या ग्रामपंचायतींना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे.