ST Strike: रत्नागिरी विभागात एकाच दिवशी परतले १७५ एसटी कर्मचारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:33 IST2022-04-18T13:31:22+5:302022-04-18T13:33:12+5:30
न्यायालयाने आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांना दि. २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

ST Strike: रत्नागिरी विभागात एकाच दिवशी परतले १७५ एसटी कर्मचारी
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेले पाच महिने कामबंद आंदोलन सुरू होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले. त्यानुसार रत्नागिरी विभागातील १७५ एसटी कर्मचारी रविवारी कामावर परतले आहेत.
न्यायालयाने आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांना दि. २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयीन आदेशाचे पालन करून एसटी कर्मचारी कामावर परतण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. येत्या चार दिवसांत बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाल्याने एसटी सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
रविवारी (दि. १७) ६३ चालक, २९ वाहक, ३८ चालक कम वाहक, ३९ कार्यशाळा कर्मचारी, सहा प्रशासकीय कर्मचारी मिळून एकूण १७५ कर्मचारी हजर झाले आहेत. सोमवारी हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दि. ९ एप्रिल ते आजपर्यंत १४९ चालक, १०१ वाहक, २०३ चालक कम वाहक, ६७ कार्यशाळा व १२ प्रशासकीय कर्मचारी हजर झाले आहेत. कर्मचारी उपस्थिती वाढल्याने एसटीच्या फेऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. सध्या ३५० ते ४०० फेऱ्या धावत आहे. ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यासह शहरी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रशासन नियाेजन करीत आहे.