रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना नुकसानापोटी १५ लाख मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:46 IST2025-07-28T15:45:17+5:302025-07-28T15:46:51+5:30
मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा बागायतदारांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले

संग्रहित छाया
रत्नागिरी : राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानापाेटी शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीला मान्यता दिली आहे. त्यानुसार एप्रिल, मे महिन्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील १८३ आंबा बागायतदारांच्या एकूण ४०.०१ हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानापाेटी शासनाकडून १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. याची झळ बागायतदारांना बसत आहे. फेब्रुवारी ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील ४७३.६९ हेक्टर क्षेत्र बाधित हाेऊन १३,६०७ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्चमध्ये पाऊस पडलेला नाही. त्यामुळे त्या कालावधीत नुकसान झालेले नाही. मात्र, एप्रिल व मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा बागायतदारांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नुकसानापाेटी जिल्ह्यात नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना शासनाकडून १५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची ही रक्कम जमा केली जाणार आहे.
- कृषी विभागातर्फे एप्रिल व मे महिन्यातील नुकसानग्रस्त भागाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. एप्रिलमध्ये राजापूर तालुक्यातील ३० आंबा बागायतदारांचे १३.३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या नुकसानापाेटी ३ लाख ४ हजार रुपये इतक्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती.
- मे महिन्यात जिल्ह्यातील १५३ आंबा बागायतदारांचे २६.६६ हेक्टर क्षेत्र बाधित हाेऊन ७ लाख रुपयांचे नुकसान झाले होते.