रत्नागिरी एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी अखेर शासकीय सेवेत कायम
By शोभना कांबळे | Updated: April 19, 2023 15:45 IST2023-04-19T15:44:42+5:302023-04-19T15:45:17+5:30
राज्यभरातील एकूण ८८ जणांना कायम करण्यात आले

रत्नागिरी एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी अखेर शासकीय सेवेत कायम
रत्नागिरी : येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या १३ कर्मचाऱ्यांना राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे सेवेत कायम करण्यात आले. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना मंत्री सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
मागील अनेक वर्षांपासून अनेक कर्मचारी एमआयडीसीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत होते. काही जण तर २७ वर्षे काम करत हाेते. एवढ्या प्रदीर्घ काळानंतर तरी सेवेत कायम करा, अशी त्यांची मागणी होती. मात्र, त्यांची ही मागणी आत्तापर्यंत दुर्लक्षितच होती.
मात्र, पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसीने बुधवार, दि. १९ रोजी १३ जणांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. या निवड झालेल्या उमेदवारांमध्ये चालक, पंपचालक, निरीक्षक, शिपाई, लिपीक आदींचा समावेश आहे. यासह राज्यभरातील एकूण ८८ जणांना कायम करण्यात आले आहे.
या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देताना एमआयडीसीचे सीईओ बिपीन शर्मा, एचआर विभागाचे महाव्यवस्थापक तुषार मटकर आदी उपस्थित होते.