जिल्ह्यात क्षयरोगाच्या १०२, कुष्ठरोगाच्या ९ रुग्णांची नोंद, सव्वा आठ लाख लोकांची तपासणी पूर्ण
By रहिम दलाल | Updated: September 25, 2022 18:23 IST2022-09-25T18:22:22+5:302022-09-25T18:23:42+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोगाच्या १०२, कुष्ठरोगाच्या ९ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात क्षयरोगाच्या १०२, कुष्ठरोगाच्या ९ रुग्णांची नोंद, सव्वा आठ लाख लोकांची तपासणी पूर्ण
रत्नागिरी: आरोग्य विभागाने १३ सप्टेंबरपासून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत सुरु केलेल्या कुष्ठ व क्षयरोग शोध मोहिमेमध्ये आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील ८ लाख ३० हजार ३०६ लोकांची तपासणी केली आहे. त्यामध्ये जिल्हाभरात क्षयरोगाचे १०२ रुग्ण तर ९ कुष्ठ रोगी सापडले आहेत.
आरोग्य विभागाकडून कुष्ठ व क्षयरोग शोध मोहीम १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १,२६९ आरोग्य पथकांमध्ये २,५९६ कर्मचारी आणि २६२ सुपरवायझर काम करत आहेत . यामध्ये जिल्ह्यातील सुमारे १६ लाख २६ हजार ९२४ लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य पथकांकडून त्यापैकी जिल्ह्यातील ८ लाख ३० हजार ३०६ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन क्षयरोग आणि कुष्ठरोगाचे सर्वेक्षण केले जात आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यात मागील १० दिवसांमध्ये क्षयरोगाचे रुग्ण पुढीलप्रमाणे आढळले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी- ११ रुग्ण, राजापूर- १४, चिपळूण -१८, दापोली –७, गुहागर -८, संगमेश्वर -१८, खेड -११, लांजा -६, मंडणगड - ९ रुग्ण आढळले आहेत. या तपासणीला लोकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे.