चोरीला गेलेला बैल हवाय? जन्माचा दाखला द्या! पोलिसांच्या अजब प्रश्नाने मालक गेला चक्रावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:13 IST2025-11-04T13:12:19+5:302025-11-04T13:13:25+5:30
आम्ही न्याय मागायचा कुणाकडे?? शेतकरी हतबल

चोरीला गेलेला बैल हवाय? जन्माचा दाखला द्या! पोलिसांच्या अजब प्रश्नाने मालक गेला चक्रावून
कांता हाबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नेरळ: तुमच्या गायीने खोंडाला जन्म दिला असेल, तर त्याच्या जन्माची नोंद जरूर करा. कारण, भविष्यात जर ते चोरीला गेले तर त्याचा शोध घेण्यासाठी या जन्माच्या दाखल्याची गरज पडेल. आता त्याच्या जन्माची नोंद कुठे करायची आणि दाखला कोण देणार, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर त्याचे उत्तर शोधायला कर्जतपोलिस चौकीत यावे लागेल. कारण, बैल चोरीला गेला म्हणून तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यालाच कर्जत चौकी पोलिसांनी बैलाच्या जन्माचा दाखला कुठाय?, असा अजब प्रश्न विचारल्याने शेतकरीही चक्रावले आहेत.
कर्जत तालुक्यातील अंजप गावातील तानाजी माळी या शेतकऱ्याचा बैल रविवारी पहाटे चोरट्यांनी घराच्या अंगणातूनच पळवून नेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन ते चार गोतस्कर पावाचे तुकडे टाकून बैलाला खेचत आलिशान वाहनात बसवताना स्पष्ट दिसत आहेत. सकाळी उठल्यावर माळी यांना बैल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ कशेळे पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली, मात्र तेथे तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे शेतकरी कर्जत पोलिस ठाण्यात आला. तेथे पोलिसांनी शेतकऱ्याला चोरीला गेलेल्या बैलाचा जन्मदाखला आणा, असे सांगताच शेतकरी आगतिकपणे फक्त पाहतच राहिला. शेतकऱ्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तालुक्यात गोतस्करांचा दबदबा वाढल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.
आम्ही न्याय मागायचा कुणाकडे??
माझं पीक गेलं, बैलही गेला आणि न्याय मागायला गेलो, तर पोलिस दाखला मागतात. आम्ही न्याय कुणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल शेतकऱ्याने केला आहे.
प्रशासन व पोलिस यंत्रणा यावर तातडीने कारवाई करणार, की आणखी एखाद्या शेतकऱ्याचा बैल चोरीला जाण्याची वाट बघणार, असा सवालही उपस्थित होत शेतकरी संघटनांनी उपस्थित केला असून, याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चोरीला गेलेल्या बैलाचा जन्मदाखला मागणारे पोलिस शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, याप्रकरणी कशेळी पोलिसांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
अवकाळीने गिळले रान, जनावरांवर चोरट्यांचा डोळा
एकीकडे परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले, भात पिके पाण्यात बुडाल्याने शेतीसह शेतकऱ्यांचा संसारही उद्ध्वस्त झाला. शासनाने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यातच तालुक्यात गोतस्करांचे थैमान सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ-कोदीवले परिसरात तस्करांनी शेतकऱ्याचा बैल कापून त्याचे मांस विक्रीसाठी नेल्याचे प्रकरण उघड झाले होते. आता पुन्हा अंजपमध्ये ही घटना घडली.