virat kohli anushka sharma moved to alibag after due to coronavirus threat kkg | VIDEO: कोरोनाचा सेलिब्रिटींनीही घेतला धसका?; विराट, अनुष्कानं अलिबागमध्ये हलवला मुक्काम

VIDEO: कोरोनाचा सेलिब्रिटींनीही घेतला धसका?; विराट, अनुष्कानं अलिबागमध्ये हलवला मुक्काम

-आविष्कार देसाई

अलिबाग : कोरोना विषाणूचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. त्यातून चित्रपट, क्रिकेट जगतातील सेलिब्रिटीदेखील यामधून सुटलेले नाहीत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी थेट अलिबाग-मांडवा गाठले आहे.  भारतीय क्रिकेटचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा अलिबाग तालुक्यातील आवास येथे आलिशान बंगला आहे. त्या बंगल्यामध्ये हे दाम्पत्य गेल्या पाच-सहा दिवसांपासून वास्तव्यास होते. परंतु सातत्याने नागरिक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत असल्याने तेथून त्यांनी मुक्काम हलवला असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी लोकमतला सांगितले.

अलिबाग-मांडवा परिसरामध्ये बडे उद्योजक आणि सेलिब्रिटींचे फार्म हाऊस, बंगले आहेत. मुंबईपासून अवघ्या 16 सागरी मैल अंतरावर असलेल्या मांडवा परिसरात त्यांचे अधून-मधून विशेष करुन वीक एण्डला येणे-जाणे असते. सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातील, राज्यातील कोरोना बांधीतांचा आकडा हा वाढतच आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन खबरदारीसाठी विविध उपाय योजना करत आहेत. सध्या तरी अलिबागमध्ये कोरानाबाधित अथवा कोरोनाचा संशयीत सापडलेला नाही. सहा दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा-कोहली यांचे मांडवा जेटीवर आगमन झाले होते. त्यानंतर ते आवास येथील रवी शास्त्री यांच्या बंगल्यावर गेले. त्या बंगल्यात दोघेही राहात असल्याने त्यांची एक झलक पाहण्यासाठी नागरिक बंगल्याच्या बाहेर गर्दी करू लागले. गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची डोकेदुखी वाढली. सातत्याने नागरिकांचा वाढता त्रास पाहून विराट अनुष्काने बंगल्यातील आपला मुक्काम हलवला असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. सध्या कातळपाडा येथील एका फार्महाऊसमध्ये ते राहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: virat kohli anushka sharma moved to alibag after due to coronavirus threat kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.