कोविडमध्ये उत्पादक संघटनेचे योगदान मोलाचे, प्रतिमा पुदलवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 23:16 IST2020-12-24T23:15:04+5:302020-12-24T23:16:07+5:30
Pratima Pudalwad : महाड उत्पादक संघटनेच्या वतीने ऑगस्ट महिन्यात औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरचा समारोप आणि या सेंटरमध्ये अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्यसेवक आणि इतर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कोविडमध्ये उत्पादक संघटनेचे योगदान मोलाचे, प्रतिमा पुदलवाड
महाड : शासनाला महाड उत्पादक संघटनेसारख्या संस्थांची माणुसकीच्या भावनेतून मिळालेली मदतच कोरोनाचा प्रतिबंध करण्यास मोलाची ठरली, असे गौरवोद्गार महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी एमएमए कोविड सेंटर येथे बोलताना काढले. तर महाड औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखानदारांच्या सहकार्यानेच कोविड सेंटरचे आव्हान पेलण्यात एमएमए यशस्वी झाल्याचे या संस्थेचे चेअरमन संभाजी पाठारे यांनी सांगितले.
महाड उत्पादक संघटनेच्या वतीने ऑगस्ट महिन्यात औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरचा समारोप आणि या सेंटरमध्ये अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्यसेवक आणि इतर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विशेष अतिथी म्हणून महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड या बोलत होत्या. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे, एमएमएचे अध्यक्ष संभाजी पाठारे, देवा ड्रिलचे चेअरमन मोहनकुमार, केएसएफचे संचालक नीलेश लिमये, नायब तहसीलदार बी.एन. कुडाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. एजाज बिराजदार, सेंटरच्या इन्चार्ज डाॅ. भाग्यरेखा पाटील, डाॅ. फैसल देशमुख, डाॅ. आदित्य म्हामुणकर आदी उपस्थित होते.
शेकडो रुग्णांना दिलासा
संभाजी पाठारे यांनी सुरुवातीच्या काळात हे सेंटर उभारण्यासाठी खर्च केलेला लाखोंचा खर्च पाण्यात जाईल, अशी साशंकता होती. मात्र, संघटनेचा हेतू प्रामाणिक असल्याने आरोग्यसेवक, खासगी डाॅक्टर्स आणि स्वयंसेवकांच्या मदतीनेच शेकडो रुग्णांना दिलासा देण्याचे काम या सेंटरमधून झाल्याचे सांगून, कोरोना रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने तूर्तास हे सेंटर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संमतीनुसार ३१ डिसेंबरपासून बंद करण्यात येणार असल्याचे पाठारे यांनी सांगितले.