मंगेश काळोखे हत्या प्रकरणात दोन प्रमुख आरोपींना अटक; हत्येचा खटला फास्टट्रॅक काेर्टात चालवणार : शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:48 IST2025-12-28T12:47:53+5:302025-12-28T12:48:29+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी काळोखे कुटुंबाची भेट घेतली.

मंगेश काळोखे हत्या प्रकरणात दोन प्रमुख आरोपींना अटक; हत्येचा खटला फास्टट्रॅक काेर्टात चालवणार : शिंदे
खोपोली : शिंदेसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रवींद्र देवकर व त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना अटक केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी काळोखे कुटुंबाची भेट घेतली.
आरोपींच्या अटकेसाठी शुक्रवारी दिवसभर दोन ते तीन हजार जणांनी पोलिस ठाण्यात ठिय्या धरला होता. मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे यांनीही पोलिस ठाण्यात जाऊन सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर मध्यरात्री मंगेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगेश हत्येचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
सर्व आरोपींना अटक करा : आमदार थोरवे
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व रवींद्र देवकर यांनी संगनमताने काळोखे यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. एफआयआरमध्ये नावे असलेल्या सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
स्वतंत्र एसआयटी नेमा : सुनील तटकरे
मंगेश यांची झालेली हत्या ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करून याची सखोल चौकशी करावी. पोलिसांनी सर्व यंत्रणा वापरून योग्य तो तपास करावा. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नसेल, असा ठाम विश्वास असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.