उरणमध्ये तिरंगी लढत अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:33 PM2019-08-29T23:33:03+5:302019-08-29T23:33:21+5:30

उरण विधानसभा मतदारसंघ : भाजपची बंडखोरी सेनेला तापदायक ठरणार

tri fight in uran for vidhansabha | उरणमध्ये तिरंगी लढत अटळ

उरणमध्ये तिरंगी लढत अटळ

Next

मधुकर ठाकूर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : उरण (१९०) विधानसभेच्या तिसऱ्या निवडणुकीची तयारी मतदारसंघात सुरू झाली आहे. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत.
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेकाप, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. मात्र, २०१९ मध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी राजकीय पक्षांनी आघाडीत सामील होऊन एकत्रितपणे निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. तर मागील साडेचार वर्षांत एकमेकांना शिव्याशाप आणि परस्परांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत पुन्हा सत्तेसाठी एकत्र आलेल्या सेना-भाजपतील तिढा अद्याप सुटलेला नाही.


युती होणारच आणि युतीच्या जोरावरच आगामी विधानसभेच्या निवडणुका लढविल्या जाणार असल्याचे सेना-भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, युतीची अधिकृत घोषणा अद्याप तरी झालेली नाही. त्यामुळे शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशा आघाडीतर्फे माजी आमदार विवेक पाटील, सेनेतर्फे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांची नावे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मात्र, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी बंडखोरीच्या तयारीत आहेत. तशी घोषणाही बालदींकडून विविध जाहीर कार्यक्रमातून वारंवार केली जाऊ लागली आहे.
नव्याने निर्माण झालेल्या उरण विधानसभेच्या दोन निवडणुका पार पडलेल्या आहेत. १९९९ च्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांनी काँग्रेसच्या दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांना पराभूत करून स्वतंत्र उरण विधानसभेत निवडून येण्याचा मान मिळविला होता. तर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पनवेल-उरण मतदारसंघांतून सलग तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेल्या विवेक पाटील यांना आत्मविश्वास नडला. मतदारसंघातील समस्या सोडविण्यातही विवेक पाटील अपयशी ठरले. त्यामुळे नाराज झालेल्या मतदारांकडून त्यांना पराभवाची चव चाखावी लागली.


रायगड जिल्ह्यात भाजपचे नामोनिशाणही नव्हते. मात्र, रामशेठ ठाकूर यांच्यासह पनवेलचे काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी हजारो समर्थकांसह ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजप प्रवेशामुळे पनवेल-उरणमधील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. हजारो काँग्रेस कार्यकर्ते भाजपवासी झाल्याने उरण मतदारसंघात काँग्रेसची स्थिती दयनीय झाली. रामशेठ यांच्या भाजप प्रवेशाने उरण मतदारसंघातील काँग्रेसची सुमारे वीस हजार मते भाजपकडे गेली. त्याचा जबरदस्त फटका काँग्रेसचे उमेदवार महेंद्र घरत यांना बसला आणि घरत यांचे विजयाचे स्वप्न भंगले. घरत यांना तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे भाजपकडून उमेदवारी मिळालेले महेश बादली यांना रामशेठ यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांना मते खेचण्यात यश आले.
सेनेचे उरण विधानसभेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत काही विकासकामे झाली असली तरी ती प्रभावी नसल्याचा सूर आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि जेएनपीटीचे माजी ट्रस्टी महेश बादली यांनी युती होवो अथवा न होवो विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढविण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. बालदी यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून विविध जाहीर कार्यक्रमातून वारंवार पाठिंबाही दिला जात आहे.


मात्र, प्रत्यक्षात सेना- भाजप युतीची अधिकृतपणे घोषणा करण्यात आल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागलेल्या महेश बालदी यांना जाहीरपणे मदत करतील का ? भाजपचे प्रचार प्रमुख आणि प्रामुख्याने रामशेठ ठाकूर यांच्यावरच पनवेल-उरण मतदारसंघातील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराची भिस्त असताना पक्षशिस्त डावलून अपक्ष उमेदवाराचा प्रचार करतील का? या प्रश्नाबाबत मतदारसंघातील नागरिक, मतदारांना मोठी उत्सुकता आहे. मात्र, यामुळे सेनेचे मनोहर भोईर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता अधिक आहे.अशा गोष्टी घडल्यास पनवेलमध्ये भाजपलाही सेना अडचणी निर्माण करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शेकाप, काँग्रेस, राष्टÑवादी व मनसेच्या आघाडीचा फटका
२०१९ मध्ये होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटले आहे. कारण मागील निवडणूक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर लढविल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशी आघाडी झाली आहे. आघाडीतर्फे माजी आमदार विवेक पाटील यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. आघाडीमुळे मागील विधानसभा निवडणुकीत सेनेकडून ८११ मतांनी झालेल्या पराभवाची परतफेड केली जाऊ शकते. त्यादृष्टीने शेकापने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, विवेक पाटील यांच्या बिघडलेल्या प्रकृतीचा विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे.

युतीवर राजकीय
गणिते अवलंबून

सेना-भाजप युती झाली तरी अपक्ष म्हणून मिळणाºया कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे भाजप नेत्यांच्या समक्षच महेश बालदी यांनी पनवेलमध्ये झालेल्या बुथ कमिट्यांच्या मेळाव्यात जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत अटळ आहे. त्यामुळे सेना उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: tri fight in uran for vidhansabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.