माणगावमधून रेल्वे जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:35 AM2021-03-03T00:35:55+5:302021-03-03T00:36:01+5:30

खासदार सुनील तटकरे यांची कोकण रेल्वे चेअरमन यांना ताकीद

Trains will not be allowed to pass through Mangaon | माणगावमधून रेल्वे जाऊ देणार नाही

माणगावमधून रेल्वे जाऊ देणार नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : माणगाव शहरात कोकण रेल्वे दुपदरीकरणाच्या उंच भरावांमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. या आधी दोन वेळा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. परंतु त्यांनी त्यावर योग्य ती कारवाई अद्यापपर्यंत केलेली नाही हे प्रत्यक्षात कचेरी रोड येथे स्वतः जाऊन खासदार सुनील तटकरे यांनी पाहणी केले असता निदर्शनास आले. त्यावर कोकण रेल्वे चेअरमन यांना संपर्क केला असता पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ते काम करा अन्यथा माणगाव शहरातून रेल्वे जाऊ दिली जाणार नाही, अशी सक्त ताकीद खासदार सुनील तटकरे यांनी दिले.


१ मार्च रोजी माणगाव तहसील कार्यालय येथे खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ज्या समस्या माणगावकरांना भेडसावत आहे त्याचे निवारण करून लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश खासदार सुनील तटकरे  यांनी कोकण रेल्वे, एमएसआरडीसी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  मोर्बा रोडवर गेली अनेक वर्षे गटाराचा प्रश्न प्रलंबित आहे. तेथेही प्रत्यक्षात खा. तटकरे यांनी भेट देऊन गटाराचा प्रश्न लवकर मार्गी लावावा व उपजिल्हा रुग्णालयासमोरील विद्युतीकरणाचे काम म्हणजे विद्युत खांब हलविणे लवकर करावे असे आदेश विद्युत मंडळ अधीक्षक अभियंता यांना दिले. निजामपूर रोडवरील रेल्वे ब्रिजजवळ एमएसआरडीसीने केलेल्या कामामुळे नैसर्गिक होणाऱ्या पाण्याचा निचऱ्याला अडथळा निर्माण झालेला आहे. तिथे येत्या ४ दिवसात महामार्ग अधिकाऱ्यांनी पाहणी करून स्लॅब ड्रेनेजचे तसेच आवश्यक ते काम करावे असेही आदेश देण्यात आले. 
यावेळी माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, नितीन वाढवळ आदी नगरसेवक, कोकण रेल्वे, एमएसआरडीसी, एमएसईबी अधिकारी व नागरिक उपस्थित होते.


काम गतीने पूर्ण करावे
मुंबई-गोवा, दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना ज्या चुका झालेल्या आहेत त्या सुधाराव्या व काम जलद गतीने पूर्ण करावे. तसेच अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे माणगाव येथे बंद करण्यात आले आहेत. याबाबत रेल्वे पूर्णतः मार्गावर सुरू झाल्यानंतर माणगाव येथे सर्व गाड्यांचे थांबे देण्यात यावेत व माणगाव येथे मोठे जंक्शन करण्यात यावे, यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचीही लवकरात लवकर भेट घेणार असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Trains will not be allowed to pass through Mangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.