काशीद समुद्रकिनारी पर्यटकाचा बुडून मृत्यू, दुसरी घटना; पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:48 IST2025-01-02T14:48:13+5:302025-01-02T14:48:26+5:30
प्रतीक आपल्या मित्रांबरोबर रिक्षाने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काशीदला आला होता. त्याच्याबरोबर गणेश सहस्रबुद्धे, रिक्षा चालक शदाब अविद मलिक, राकेश राजू पवार हे चौघे मित्र होते.

काशीद समुद्रकिनारी पर्यटकाचा बुडून मृत्यू, दुसरी घटना; पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर
आगरदांडा : काशीद समुद्रकिनारा पर्यटकांना भुरळ घालत असला, तरी धोकादायक ठरत आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आलेल्या पुण्यातील एका पर्यटकाचा मंगळवारी बुडून मृत्यू झाला. प्रतीक प्रकाश सहस्रबुद्धे (वय ३१, पुणे) असे बुडून पर्यटकाचे नाव आहे.
प्रतीक आपल्या मित्रांबरोबर रिक्षाने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काशीदला आला होता. त्याच्याबरोबर गणेश सहस्रबुद्धे, रिक्षा चालक शदाब अविद मलिक, राकेश राजू पवार हे चौघे मित्र होते. मंगळवारी दुपारी ३:३० वा. प्रतीक व त्याचे मित्र पाण्यात उतरले. पोहून झाल्यावर स्पोर्ट बाइकवर सफारीचा त्यांचा बेत होता. म्हणून पैसे आणण्यासाठी त्याचे मित्र रिक्षाकडे गेले.
पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला
प्रतीक पोहत होता. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. मित्रांना वाटले, तो पाण्याबाहेर आला असेल, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, दीड तासानंतर प्रतीक पाण्यात तरंगताना लाइफ गार्ड यांना दिसला.
- पोलिस व लाइफ गार्ड यांनी समुद्राच्या पाण्यात उतरून त्याला बाहेर काढले, परंतु प्रतीक हा प्रतिसाद देत नव्हता. त्यास ताबडतोब मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणले.मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
- या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी मुरुड ठाण्याचे पोलिस हवालदार हरी मेंगाळ अधिक तपास करीत आहेत.