श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला आला बहर;  हरिहरेश्वर, दिवेआगर, दिघीत ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:57 AM2020-11-29T00:57:47+5:302020-11-29T00:58:06+5:30

आठ महिन्यांनी तालुक्यातील पर्यटन पूर्वपदावर येण्यास सुरुवात

Tourism in Shrivardhan taluka is booming; Harihareshwar, Diveagar, Dighit Ogh | श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला आला बहर;  हरिहरेश्वर, दिवेआगर, दिघीत ओघ

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला आला बहर;  हरिहरेश्वर, दिवेआगर, दिघीत ओघ

googlenewsNext

संतोष सापते

श्रीवर्धन : नोव्हेंबर महिन्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. 
महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून श्रीवर्धन तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना पर्यटकांनी भेटी देण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील श्रीवर्धन, आरावी, दिघी या गावांना पर्यटकांनी सर्वप्रथम पसंती दिली. त्यानंतर राज्य सरकारने मंदिर खुले करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे दिवेआगार, हरिहरेश्वर, देवखोल, जावेळे या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली. 

गेल्या आठ महिन्यांपासून श्रीवर्धनमधील हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग व्यवसायिक पर्यटकांअभावी हतबल झाले होते. कर्ज काढून सुरू केलेले उद्योग नष्ट होण्याच्या मार्गावर होते. बँक कर्ज परतफेडीचा प्रश्‍न उभा राहिला होता. मात्र तालुक्यात पर्यटकांचा वाढता ओघ निश्चितच सर्व व्यावसायिकांसाठी संजीवनी मानली जात आहे. शनिवार, रविवार व सोमवार सर्व समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र त्यासोबत कोरोना संसर्गाचा धोकासुद्धा वाढत आहे.

गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये पर्यटकांची संख्या घटल्यामुळे तालुक्यातील सर्व व्यावसायिकांना मोठ्या स्वरूपात त्याचा फटका बसला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन व्यावसायिकांनी व्यवसायाला सुरुवात केली आहे. - तेजस ठाकूर, व्यावसायिक श्रीवर्धन

या महिन्याच्या सुरुवातीपासून पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मंदिरे खुली केल्यापासून भाविक व पर्यटक यांची गर्दी सुरू झाली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले हॉटेल व्यवसाय पुन्हा एकदा नव्याने भरारी घेण्यास सज्ज झाले आहेत. - सुयोग लांगी, हरिहरेश्वर व्यावसायिक

ढगाळ वातावरणामुळे पर्यटकांची संख्या रोडावली

मुरुड जंजिरा : शुक्रवारी सकाळच्या सुमारास २५ किमी प्रति तास वेगाने मुरुड तालुक्यात निवार चक्रीवादळ धडकल्याने नागरिक भयभीत झाले होते. ‘निवार’ चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रात बसण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे सागरी किनाऱ्यावर वसलेल्या मुरुड भागात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आज दिवसभरात सूर्याचे दर्शनच झाले नाही. ढगाळ वातावरणाचा परिणाम पर्यटकांवर झाल्याचे दिसून येत आहे. 

शनिवार असूनसुद्धा पर्यटक फिरकले नाहीत. फार अल्प प्रमाणातच पर्यटक समुद्रकिनारी दिसत होते. हवामानाचा फटका मुरुडच्या पर्यटनावरसुद्धा दिसून आला आहे. शनिवारी-रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने काशीद व मुरुड समुद्रकिनारी येत असतात. खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीसुद्धा किनाऱ्याला लागलेल्या आढळून येत आहेत. मुरुड तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र हे नारळ, सुपारी बागायत जमिनीचे आहे. काल जोरदार वारा वाहिल्याने नारळ, सुपारीची झाडे मोठ्या वेगाने हालत होती. परंतु अद्यापर्यंत कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही. अशा ढगाळ वातावरणामुळे लोकांनी प्रवास करणे टाळले आहे. त्यामुळे कोणत्याही बस स्थानकावर गर्दी दिसून आली नाही.
 

Web Title: Tourism in Shrivardhan taluka is booming; Harihareshwar, Diveagar, Dighit Ogh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.