रायगडमध्ये पावसाचा तीन दिवसांचा रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 23:36 IST2020-07-14T23:35:42+5:302020-07-14T23:36:02+5:30
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनारील गावे, खाडी किनाऱ्यावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

रायगडमध्ये पावसाचा तीन दिवसांचा रेड अलर्ट
अलिबाग : मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्यांचा वारा असा मान्सूनचा झंझावात १४ ते १६ जुलैपर्यंत तीन दिवस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनारील गावे, खाडी किनाऱ्यावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी
५ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण अधिक असणार आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, काळ, भोगावती, उल्हास, गाढी या नद्यांच्या पातळीत वाढ झालेली नव्हती, त्यामुळे धोकादायक स्थिती उशिरापर्यंत नव्हती. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २८.०५ मिमी पाऊस झाला, तसेच १ जूनपासून मंगळवार अखेर एकूण सरासरी ११३८.४५ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.