बोगस प्रमाणपत्र देऊन पोलीस बनण्याचे स्वप्न भंग;रायगड पोलीस भरतीतील चार जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 13:19 IST2023-06-13T13:12:38+5:302023-06-13T13:19:55+5:30
गडचिरोली पोलिस भरतीत बोगस प्रकल्पग्रस्त प्रकरण उघडकीस आले होते.

बोगस प्रमाणपत्र देऊन पोलीस बनण्याचे स्वप्न भंग;रायगड पोलीस भरतीतील चार जणांना अटक
राजेश भोस्तेकर
अलिबाग : गडचिरोली पोलिस भरतीत बोगस प्रकल्पग्रस्त प्रकरण उघडकीस आले होते. रायगड पोलीस भरतीतही चार जणांनी नोकरी लागण्यासाठी बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अटक करण्यात आली आहे. बोगस प्रकरणात अजून काही जणांची नावे समोर येणार आहेत. अलिबाग पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.
राज्यात पोलीस भरती शासनाने जाहीर केली होती. रायगड पोलीस दलात २७२ जागांसाठी डिसेंबर महिन्यात भरती प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी हजारो उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मैदानी चाचणी, लेखी परीक्षा मध्ये पात्र झालेल्या २७२ जणांची अंतिम यादी पोलीस प्रशासनाने जाहीर केली होती. या भरतीत प्रकल्पग्रस्तांसाठीही जागा असल्याने प्रकल्पग्रस्त उमेदवार भरतीत उतरले होते.
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीत बोगस प्रमाणपत्र प्रकरण झाले असून यामध्ये अलिबागमधील पोलीस शिपाई याला अटक झाली होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्त पात्र उमेदवार यांचे प्रमाणपत्र तपासणीसाठी रायगड पोलिसांनी बीड, सोलापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी आपले पथक पाठवून माहिती गोळा केली होती. या माहितीत रोहित बबन मगर, सोलापूर केशव गिरजाची मुरमुरे, नांदेड, गोविंद सुखदेव ठाणगे, बीड, अच्युत भागवत माने, बीड या चौघांनी बोगस प्रमाणपत्र देऊन शासकीय नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.
अलिबाग पोलीस ठाण्यात चौघा विरोधात ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कोणी दिले यासाठी किती रक्कम दिली याबाबत पुढील तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव हे करीत आहेत.