सख्खे शेजारी, पक्के वैरी...; भिंतीवरून उचलून नेला मृतदेह, अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता! पोसरी गावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 06:38 AM2024-01-06T06:38:47+5:302024-01-06T06:39:39+5:30

वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद असल्याने शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेलाही रस्ता न दिल्याची धक्कादायक घटना रसायनी-वासांबेतील नवीन पोसरी गावात घडली. त्यामुळे मृतदेह उचलून भिंतीवरून नेण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली.

The dead body was lifted from the wall, even the funeral procession was not allowed Incident in Posari village | सख्खे शेजारी, पक्के वैरी...; भिंतीवरून उचलून नेला मृतदेह, अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता! पोसरी गावातील घटना

सख्खे शेजारी, पक्के वैरी...; भिंतीवरून उचलून नेला मृतदेह, अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता! पोसरी गावातील घटना

मोहोपाडा : वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद असल्याने शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेलाही रस्ता न दिल्याची धक्कादायक घटना रसायनी-वासांबेतील नवीन पोसरी गावात घडली. त्यामुळे मृतदेह उचलून भिंतीवरून नेण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली. मरणान्ती वैराणी असे सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीत मृत्यूनंतरही वैर कायम राहिल्याने ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केला.  

खारकर आळीमध्ये खंडू हाल्या खारकर आणि रघुनाथ शंकर पाटील शेजारी-शेजारी राहतात. खारकर आणि इतर शेजाऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता पाटील यांच्या दारातून जातो. खंडू खारकर यांचे ४ जानेवारीला निधन झाले. अंत्ययात्रा नेण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी रघुनाथ पाटील यांना तात्पुरता रस्ता खुला करण्याची विनंती केली. मात्र, त्यांचा मुलगा नीतेश यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे नातेवाइकांनी भिंतीवरून खंडू खारकर यांचा मृतदेह उचलून एकमेकांकडे देत अंत्ययात्रा कशीबशी पुढे नेली.

ग्रामस्थांत संताप
- या प्रकारामुळे ग्रामस्थांत संताप आहे. प्रशासनाने जर वेळीच लक्ष घातले असते, तर ही वेळ आली नसती. 
- माणुसकीला काळिमा फासणाऱ्या रघुनाथ पाटील आणि त्यांच्या मुलाच्या वागणुकीमुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. 
- आता तरी तहसीलदारांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काही महिन्यांपासून हा रस्ता बंद आहे. तो पुन्हा खुला व्हावा, यासाठी खारकर आळीतील ग्रामस्थांनी वासांबे ग्रामपंचायत, खालापूर पंचायत समिती, खालापूरच्या तहसीलदारांकडे अर्ज दिले होते. खालापूर पंचायत समितीजवळ उपोषणही केले होते. गट विकास अधिकाऱ्यांनी रस्ता सुरू करण्याबाबत आश्वासनही दिले होते. 

वहिवाटीचा जुना रस्ता त्यांनी बंद केला आहे. यासाठी आम्ही उपोषणही केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते. मात्र, तरीही हा रस्ता बंद आहे. माझ्या वडिलांच्या अंत्ययात्रेसाठीही त्यांनी हा रस्ता खुला केला नाही. भिंतीवरून उचलून मृतदेह न्यावा लागला. त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी.
- परेश खारकर, मुलगा
 

Web Title: The dead body was lifted from the wall, even the funeral procession was not allowed Incident in Posari village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.