Taliye Landslide: तळीयेच्या तात्पुरत्या पुर्नवर्सनाचा मार्ग माेकळा; ९० गुंठे पर्यायी जागा मिळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 18:15 IST2021-07-31T18:15:14+5:302021-07-31T18:15:37+5:30
महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

Taliye Landslide: तळीयेच्या तात्पुरत्या पुर्नवर्सनाचा मार्ग माेकळा; ९० गुंठे पर्यायी जागा मिळाली
लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड ः महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. तळीये गावाजवळच एका 90 गुंठे पर्यायी जागेची प्रशासनाकडून आज पाहणी करण्यात आली. गावाच्या पुनर्वसनासाठी जी जागा पाहण्यात आली आहे, ती जागा तात्पुरत्या पुनर्वसनाकरिता देण्यासाठी जागेच्या मालक "सुरेखा तुळशीराम म्हस्के" यांनी लेखी स्वरुपात "नाहरकत" प्रशासनाला तात्काळ दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाणी, वीज पुरवठा होण्याबाबतची सुविधा उपलब्ध होईल किंवा कसे याबाबतचीही पाहणी पाणीपुरवठा, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. या जागेस त्यांच्याकडूनही संमती देण्यात आली आहे.
या कामाकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दिलीप रायन्नावार हे समन्वयकाची जबाबदारी पार पाडीत आहेत. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी, तळीये गावचे सरपंच संपत तांडलेकर, उपसरपंच यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते