Raigad Suspicious Boat: कोर्लई येथील समुद्रात एक संशयित बोट आल्याने जिह्यात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरावर ही बोट संशयास्पदरित्या उभी आहे. पोलीस या बोटीचा तपास घेत आहेत. मात्र कोणतीही माहिती सध्या प्राप्त झालेली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अरबी समुद्रातून आतंकवादी कारवाई केल्याच्या घटना घडत असतात. श्रीवर्धन तालुक्यातील भरड खोल येथील समुद्रातून आरडीएक्स उतरविण्याची घटना घडली होती. कोर्लई येथील समुद्रात काल सायंकाळपासून एक संशयित बोट उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.
कोर्लई समुद्रकिनारी जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे घटना स्थळी दाखल झाले होते.
पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला
संशयित बोट ही दोन नॉटिकल मैल अंतरावर उभी आहे. तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मध्ये खडक असल्याने पुढे जाणे जमले नाही. बोटीमधून लाईट ब्लिंक होत आहे. रात्रीची वेळ असल्याने बोटीबाबत अधिक माहिती मिळाली नाही आहे. सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
तटरक्षक दलाचे लक्ष या संशयित बोटीवर आहे. मात्र, त्याच्याकडून कोणतीही माहिती मिळत नाही आहे. कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर समुद्र किनाऱ्यावर फिरत असते. त्याच्या दृष्टीस ही बोट कशी काय पडली नाही असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे.