सुधागडात कवेळे धरणाला गळती, पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:33 IST2019-03-26T00:33:03+5:302019-03-26T00:33:14+5:30
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिका अनेक ठिकाणी कचरा व मुळ्या जाऊन चोकअप झाल्या आहेत.

सुधागडात कवेळे धरणाला गळती, पाण्याचा अपव्यय
- विनोद भोईर
पाली : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिका अनेक ठिकाणी कचरा व मुळ्या जाऊन चोकअप झाल्या आहेत. त्यामुळे धरण व बंदिस्त नलिकांची ताबडतोब दुरुस्तीची आवश्यकता आहे. या धरणाच्या पाण्यावर असलेले सिंचनक्षेत्रही झपाट्याने घटले आहे. त्यामुळे धरणाच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
लघु पाटबंधारे विभागामार्फत १९७३ मध्ये कवेळे धरणाचे बांधकाम करण्यात आले. यावेळी १६.६८ लाखांचा खर्च आला होता. धरणाचे सिंचनक्षेत्र ८१२ हेक्टर आहे. सिंचनाच्या उद्देशाने धरणाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील इतर चार धरणांपेक्षा सर्वाधिक सिंचनक्षेत्र या धरणाचे आहे. मात्र यातील १० टक्क्यांपेक्षा कमी पाण्याचा सिंचनक्षेत्राचा वापर केला जात आहे.
गेली कित्येक वर्षे धरणाची दुरु स्ती करण्यात आलेली नाही. कवेळे धरणाला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. यावर लघुपाटबंधारे विभागाकडून जलद उपाययोजना करण्याची गरज आहे.
अतितातडीचे म्हणून कवेळे धरणाच्या दुरु स्तीचे काम केले जाणार आहे. सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी दरवर्षी स्थानिकांची बैठक घेतली जाते. बंदिस्त नलिकांची किरकोळ दुरु स्ती देखील केली जाते. मात्र जोपर्यंत सिंचनाखालील क्षेत्र वाढत नाही तोपर्यंत यांच्या दुरु स्तीसाठी शासनाकडून खर्च किंवा अनुदान दिले जात नाही.
- आर. के. सुपे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड
आधी खोदलेले कालवे बरे होते. त्याच्यावर भातशेती केली जायची. आता वारंवार जलवाहिनी चोक होत असल्याने शेवटपर्यंत पाणी पोहोचतच नाही. शिवाय गळतीचाही फटका शेतीला बसतो. त्यामुळे अनेकांनी शेतात लागवड करणेच बंद केले आहे. काही ठिकाणी कडधान्याचे पीक घेतले जात आहे.
- अंकिता विशाल चिले, सरपंच, ग्रुपग्रामपंचायत, वाघोशी