‘आधार’साठी विद्यार्थ्यांची धडपड
By Admin | Updated: August 6, 2015 03:01 IST2015-08-06T03:01:41+5:302015-08-06T03:01:41+5:30
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केल्याने पालकांची चांगलीची

‘आधार’साठी विद्यार्थ्यांची धडपड
अलिबाग : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केल्याने पालकांची चांगलीची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात २६ लाख ३४ हजार २०० लोकसंख्येपैकी २२ लाख ४३ हजार ८७२ नागरिकांनी आधारची नोंदणी केली आहे. उर्वरित आकडेवारीमध्ये जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची नोंदणी करणे अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात ८५.१८ टक्के आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे.
आधार नोंदणी करण्यासाठी ८२ किट्स देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक रोहे तालुक्यात १५, तर अलिबाग तालुक्यात १३ किट्स वितरीत केल्या आहेत. आधार नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज आहे. ते उपलब्ध नसल्याने ३८ किट्स बंद ठेवाव्या लागल्या आहेत. आॅपरेटिंगचे काम येते त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होणे बाकी आहे. त्या दिशेने प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात दोन हजार ६७९ अंगणवाडी केंद्रे, ५२० मिनी केंद्रे अशी एकूण तीन हजार १९९ केंद्रे आहेत. ० ते ५ वर्षेमधील अंगणवाडी लाभार्थ्यांची संख्या एक लाख ७५ हजार ९२८ आहे. एक हजार १२० अंगणवाडीतील ४१ हजार ४५ लाभार्थ्यांची आधार नोंदणी केली आहे, तर एक लाख ३४ हजार ८८३ लाभार्थ्यांची नोंदणी बाकी आहे.एक लाख ६३ हजार १७७ विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी नाही.