रायगड जिल्ह्यातील स्थिती; शिवारात डोलतेय ३१ लाख क्विंटल भाताचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:01 PM2020-10-10T23:01:22+5:302020-10-10T23:01:22+5:30

विविध नैसर्गिक आपत्तीमुळे १५ टक्के उत्पादनात घट

Situation in Raigad district; 31 lakh quintals of paddy crop in Shivara | रायगड जिल्ह्यातील स्थिती; शिवारात डोलतेय ३१ लाख क्विंटल भाताचे पीक

रायगड जिल्ह्यातील स्थिती; शिवारात डोलतेय ३१ लाख क्विंटल भाताचे पीक

Next

रायगड : जिल्ह्यात ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात आले आहे. जून आणि आॅगस्ट महिन्यात आलेली नैसर्गिक आपत्ती वगळता निसर्गाने शेतकऱ्यांना चांगलीच साथ दिली आहे. या वर्षी १५ टक्के नुकसान वगळता ३१ लाख ६२ हजार क्विंटल भाताचे उत्पादन शिवारातून निघण्याची शक्यता आहे. बळीराजाच्या आर्थिक परिस्थितीसाठी ही समाधानाची बाब असल्याचे सांगितले जाते आहे.

जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने भातपिकाची शेती करतो. त्याच्या जोडीला पालेभाज्यांच्या पिकाचेही उत्पादन घेतो. बहुतांश तालुक्यांमध्ये तब्बल ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेण्यात आले आहे. विविध नैसर्गिक आपत्ती, पिकावर पडणारे रोग यांचा सामना करून शेतकऱ्यांना आपल्या शिवारातील पिकाचे संरक्षण करावे लागते. जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळ आले होते. या कालावधीत पेरणीला सुरुवात झाली होती. त्यामुळे म्हणावे तसा भातपिकाला फटका बसला नाही. मात्र जुलै महिन्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील ०.९८ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. त्यामध्ये नऊ शेतकºयांना आर्थिक फटका बसला होता. आॅगस्ट महिन्यामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मुरूड तालुक्यातील १६.८५ हेक्टर क्षेत्रातील ५० शेतकºयांचे भातपिकाचे नुकसान झाले होते, तर महाडमध्ये ०.१९ हेक्टरवरील दोन शेतकºयांचे आणि पनवेल तालुक्यातील ३.०१ हेक्टरवरील १७ शेतकºयांच्या शेतातील भाजीपाला जमीनदोस्त झाला होता. आॅगस्ट महिन्यामध्ये एकूण ६९ शेतकºयांचे १९.६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

हे सुमारे १५ टक्के नुकसान वगळता अन्य ठिकाणी चांगले उत्पादन आलेले आहे. ९३ हजार हेक्टरमधून प्रति हेक्टरी ४० क्विंटल भाताचे उत्पादन होते. त्यानुसार ३७ लाख २० हजार क्विंटल भाताचे उत्पादन निघणे अपेक्षित होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे त्यामध्ये १५ टक्क्यांची घट म्हणजेच पाच लाख ५८ हजार क्विंटल भाताची नासाडी झाली आहे. आजघडीला ३१ लाख ६२ हजार क्विंटल भाताचे पीक शिवारामध्ये डोलत आहे.

काही ठिकाणी आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. परंतु उर्वरित भाताचे उत्पादन चांगले होईल असे वातावरण दिसत असल्याचे अलिबाग तालुक्यातील शेतकरी नंदू सोडवे यांनी सांगितले. आता पाऊस पडला तर हातचे आलेले पीक जाऊन शेतकरी वर्गाला चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यात ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेण्यात आले आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनामध्ये १५ टक्के घट होणार आहे. मात्र या वर्षीदेखील भाताचे उत्पादन चांगलेच निघणार आहे.
- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, रायगड

Web Title: Situation in Raigad district; 31 lakh quintals of paddy crop in Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.