भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; अंबरनाथमध्ये मतदानाला दोन दिवस असताना हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 09:27 IST2025-12-18T09:27:08+5:302025-12-18T09:27:41+5:30
भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या शिवमंदिर परिसरातील कार्यालयावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि ते पळून गेले.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; अंबरनाथमध्ये मतदानाला दोन दिवस असताना हल्ला
अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस असताना भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या शिवमंदिर परिसरातील कार्यालयावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि ते पळून गेले. हा हल्ला मंगळवारी रात्री १२ वाजता घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेच्या आदल्या दिवशीच ही घटना घडली.
हल्ल्यानंतर वाळेकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवला. वाळेकर प्रभाग चारमधून निवडणूक लढवत असून, त्यांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातील शिंदेसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचे पुत्र निखिल वाळेकर निवडणूक लढवत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला.
पुतण्याचा काकावर संशय
भाजपचे उमेदवार वाळेकर शिंदेसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचे सख्खे पुतणे आहेत. त्यामुळे गोळीबारानंतर पुतण्यानेच काकावर संशय व्यक्त केल्यामुळे हे प्रकरण त्यांच्या कुटुंबाभोवती फिरत आहे. दरम्यान, यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत.
गोळीबाराशी संबंध नाही; शिंदेसेनेचे स्पष्टीकरण
या गोळीबाराशी आपला काहीही संबंध नसून हा गोळीबार नेमका कोणी केला, याचा तपास झालाच पाहिजे, अशी भूमिका शिंदेसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांनी घेतली.