किल्ले रायगडावर १२ एप्रिलला शिवपुण्यतिथी; गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 07:01 IST2025-04-08T06:58:24+5:302025-04-08T07:01:02+5:30
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ स्थापन केले. तेव्हापासून रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम केला जातो.

किल्ले रायगडावर १२ एप्रिलला शिवपुण्यतिथी; गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : किल्ले रायगडावर शनिवारी, १२ एप्रिलला ३४५ वी शिवपुण्यतिथी तसेच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी अभिवादन कार्यक्रम साजरा होत आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी सोमवारी दिली.
अलिबाग येथील कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. लोकमान्य टिळकांनी १८९५ साली श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ स्थापन केले. तेव्हापासून रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम केला जातो.
कार्यक्रमाची रूपरेषा
यंदाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात शुक्रवारी समाधीला दीपवंदना दिली जाणार आहे. जगदीश्वर प्रांगणात कीर्तन आणि जागर होणार आहे. राज सभेत शाहीर सुरेशराव सूर्यवंशी यांचा ‘ही रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम होणार आहे. रात्रीचे भोजन, निवास, सकाळची न्याहारी आणि महाप्रसाद याची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली असल्याचेही आंग्रे यांनी सांगितले.
दुर्ग नीळकंठ रामदास पाटील यांना पुरस्कार
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराचे वाटप मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. यंदाचा पुरस्कार दुर्ग अभ्यासक नीळकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंह होळकर आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी दिली.
सीसीटीव्ही दुरुस्ती सुरू
मुंबई : रायगड किल्ल्यावरील समाधी परिसर सोडता, इतर सीसीटीव्ही रायगड विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षाने लावले आहेत. तसेच, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अखत्यारीतील सीसीटीव्ही दुरुस्ती सुरू आहे, असे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या मुंबई मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.