Schools in Panvel Municipal Corporation area closed; Fickle in the minds of parents | पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंदच; पालकांच्या मनात चलबिचल

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंदच; पालकांच्या मनात चलबिचल

वैभव गायकर

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याची परवानगी आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिली होती. मात्र शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली नाही. तसेच पालकांच्या मनातही चलबिचल असल्याने आजपासून सुरू होणाऱ्या शाळा सुरू होण्यास फेब्रुवारी महिना उगवणार असल्याचे दिसून येत आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. पालिकेच्या स्वतःच्या १० शाळांसह संपूर्ण पालिका क्षेत्रात सर्वच माध्यमांच्या २५० पेक्षा जास्त शाळा आहेत. कोविडच्या प्रादुर्भावामुळे अनेक महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून २७ जानेवारीपासून या शाळा सुरू करण्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे म्हटले होते. मात्र अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये गोंधळ कायम असल्याने शाळा सुरू होण्यास उशीर लागणार असल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोविड टेस्ट, शाळांचे सॅनिटायझेशन आदी बाबी पूर्ण करणे गरजेचे असल्याने शाळा या तयारीला लागल्या आहेत. याव्यतिरिक्त शाळा सुरू करण्यास पालक, मुलांची काहीच हरकत नसल्याचे संमतीपत्र शाळा लिहून घेत असल्याने या संपूर्ण प्रक्रियेला आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे संमतीपत्र 
शाळा सुरू झाल्यावर कोविडची साथ पसरली अथवा विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाल्यास त्याला शाळा प्रशासन जबाबदार नसल्याचे संमतीपत्र पालकांकडून लिहून घेतले जात आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाल्यास शाळा प्रशासन हात झटकण्यास मोकळे असणार आहे.

गोखले शाळेतील विद्यार्थ्यांचे काय?
शाळा सुरु करण्यास पालिकेने परवानगी दिली असली तरी खारघरच्या गोखले शाळेत अद्यापही तळोजा कारागृहातील२०० पेक्षा जास्त कैदी ठेवले आहेत. जो पर्यंत त्याठिकाणच्या कैद्यांना इतरत्र हालवत नाही तो पर्यंत शाळा कशी सुरु करणार? असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे.

महानगरपालिकेच्या मालकीच्या दहा शाळा  
पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या एकूण दहा शाळा आहेत. या शाळेतील शिक्षकांनी आपली कोरोना चाचणी केली आहे. त्याचे अहवाल प्रलंबित असल्याने शाळा २७ पासून सुरू झाल्या नसल्याची माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब चिमणे यांनी दिली.

Web Title: Schools in Panvel Municipal Corporation area closed; Fickle in the minds of parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.