घरकूल योजनेत घोटाळा
By Admin | Updated: August 9, 2015 23:21 IST2015-08-09T23:21:59+5:302015-08-09T23:21:59+5:30
ग्रामपंचायतीकडे इंदिरा आवास घरकूल योजनेंतर्गत ७४ गरीब कुटुंबांनी नवीन घरांचे बांधकाम करण्यासाठी अर्ज केले होते. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या ७४ पैकी ३७ बोगस लाभार्थ्यांनी ग्रामसेवकाला

घरकूल योजनेत घोटाळा
रोहा : ग्रामपंचायतीकडे इंदिरा आवास घरकूल योजनेंतर्गत ७४ गरीब कुटुंबांनी नवीन घरांचे बांधकाम करण्यासाठी अर्ज केले होते. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या ७४ पैकी ३७ बोगस लाभार्थ्यांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून शासनाची दिशाभूल करीत नवीन घरे न बांधता त्या ठिकाणी असलेल्या जुन्या नादुरुस्त घरांची डागडुजी, रंगरंगोटी करून लाखो रुपयांचा मलिदा हडप केल्याचा धक्कादायक प्रकार रोहा तालुक्यातील भातसई ग्रामपंचायतीत घडला आहे. या घरकूल घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी भातसई ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोतवाल यांनी केली आहे.
रोहा तालुक्यातील भातसई, वरवडे, पाले, झोळांबे, लक्ष्मीनगर या ग्रुप ग्रामपंचायतीने २०१४-१५ या वर्षात येथील ७५ ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे इंदिरा आवास घरकूल योजनेचा लाभ मिळविण्यासाठी रीतसर अर्ज करुन मागणी केली होती. भातसई ग्रामपंचायतीने संबंधित ग्रामस्थांचे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती कार्यालयात वर्ग केले. पंचायत समितीने या संबंधी अहवाल तयार करुन जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केले असता जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी ९३ हजार ५०० रु. लाभार्थींच्या खात्यात जमा केले. मात्र या लाभार्थ्यांपैकी ३७ लाभार्थी बोगस असून या योजनेत संबंधित ग्रामसेवकाने या लाभार्थ्यांशी संगनमत करुन शासनाचे लाखो रुपये लाटले आहेत, असा आरोप शेकापचे ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोतवाल यांनी केला आहे.
या बोगस लाभार्थ्यांनी आपल्या जुन्या घरांची मलमपट्टी करुन शासनाची दिशाभूल केली आहे. या घरकूल घोटाळ्यात संबंधित ग्रामसेवक दोषी असून ग्रामपंचायत सदस्य कोतवाल यांनी या विषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, आ. पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती, रोहा पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करुन या घरकूल घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)