बोडणीत पाण्याचा खडखडाट; पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट
By निखिल म्हात्रे | Updated: March 11, 2024 16:35 IST2024-03-11T16:35:09+5:302024-03-11T16:35:50+5:30
जलजीवनचे पाणी आहे कुठे?

बोडणीत पाण्याचा खडखडाट; पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट
अलिबाग : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी जिल्हा परिषदेने जलजीवन मिशन अंतर्गत प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याची हमी नागरिकांना दिली होती. मात्र आजही अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले बोडणी गाव पाण्याविना असल्याचे समोर आले आहे. या गावात लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कोरडीच आहे.
तालुक्यातील बोडणी हे मच्छीसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. या गावाची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक असून, मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. गावकऱ्यांना दरदिवशी प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी याप्रमाणे एक लाख ६५ हजारांहून अधिक लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप येथील महिलांनी केला आहे.
या गावात दोन पाण्याच्या टाक्या आहेत. त्याही कोरड्या आहेत. दिवसभर मासेमारी करण्याबरोबरच मासळी विकण्याचे काम महिला करीत असताना, रात्र जागून पाण्यासाठी घालवावी लागत आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या पाइपलाइनमधून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी बोडणी गावातील महिलांना वणवण करावी लागत असल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील गावांतील ही समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोडवतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बोडणी गाव पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक वेळा विकत पाणी आणावे लागत आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही.
- विश्वास नाखवा, अध्यक्ष, मल्हारी मार्तंड मच्छिमार सहकारी सोसायटी
रेवस प्रादेशिक अंतर्गत असलेल्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, पाणी येत नसल्याने बोडणी गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या गावाला टँकरमार्फत पाण्याची सोय करण्यात आली आहे. दर दिवशी एक टँकर उपलब्ध केला जात आहे.
- चहल चवरकर, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत समिती