पनवेलहून मुंबईला पोहोचा पाच मिनिटे आधी; हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढणार
By वैभव गायकर | Updated: June 27, 2024 10:08 IST2024-06-27T10:08:21+5:302024-06-27T10:08:44+5:30
मध्य रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेलहून मुंबईला पोहोचा पाच मिनिटे आधी; हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढणार
पनवेल : मध्य रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन लोकलमधील अंतर सुरक्षित असावे या हेतूने टिळकनगर ते पनवेलदरम्यान अडथळा नसलेल्या भागात मंगळवारपासून लोकलचा वेग अर्थात स्पीड वाढविण्यात आला आहे. यामुळे पूर्वीपेक्षा ५ मिनिटांनी अंतर कमी होणार आहे. मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
मध्य रेल्वेने पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान १८८ तर बेलापूर ते सीएसटीएम या स्थानकादरम्यान ७९ लोकल फेऱ्या होतात. हे अंतर कापण्यासाठी लोकलला अनुक्रमे ८० आणि ६५ मिनिटे लागत होती. पूर्वी प्रति तास ८० किलोमीटर या वेगाने धावणारी लोकल आता प्रति तास ९५ किलोमीटर या वेगाने धावणार आहे.
लोकल वेळेवर धावण्याची अपेक्षा
हार्बर मार्गावर लोकल वेळेत धावत नसल्याच्या प्रवाशांची अनेक वेळा तक्रार आहे. दोन लोकलमधील सुरक्षित अंतर जपण्यासाठी स्पीड वाढविण्यात आला असेल तर लोकल वेळेत धावल्या पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. - सुरेंद्र खळदे, सदस्य, रेल्वे स्थानिक सल्लागार समिती