CoronaVirus News in raigad: महाडमध्ये पंचायत समिती कार्यालयात रंगली पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 01:50 IST2020-05-01T01:49:59+5:302020-05-01T01:50:14+5:30
महिलेचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण असतानाच याबाबत कुठल्याही गांभीर्याचे भान नसलेल्या महाड पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात चक्क पार्टी झोडली.

CoronaVirus News in raigad: महाडमध्ये पंचायत समिती कार्यालयात रंगली पार्टी
महाड : महाडमध्ये कोरोनाग्रस्त महिलेचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण असतानाच याबाबत कुठल्याही गांभीर्याचे भान नसलेल्या महाड पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात चक्क पार्टी झोडली.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांचा वाढदिवस बुधवारी पंचायत समिती कार्यालयात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पंचायत समितीच्या सभागृहात तसेच सभापतींच्या दालनामध्ये मेजवानीच्या पंगती झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे शासनाची महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणा २४ तास कोरोनाशी सक्रियपणे लढा देत असतानाच दुसरीकडे पंचायत समितीच्या सभापती ममता गांगण तसेच अन्य पदाधिकारी आणि अधिकारी यांनी मात्र पार्टीला हजेरी लावली. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्टीला सभापती ममता गांगण तसेच सर्व पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचे अधिकारी तसेच सर्व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम आणि शासकीय आदेश बासनात गुंडाळून एका शासकीय कार्यालयातच भरदिवसा या पार्टीला उपस्थित पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
>पंचायत समितीमध्ये काल जो प्रकार झाला आहे. त्याबाबत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यात साथरोग कायदा १८९६, आपत्ती कायदा २००५, तसेच संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, अशा कालावधीत असे कृत्य अशोभनीय आहे. आपण याबाबत तातडीने खुलासा करावा, असे सांगितले आहे.
-विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी, महाड