लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका आदी प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. विशेषत: दक्षिण भागात मंगळवारी सकाळपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दक्षिण रायगडमध्ये अनेक ठिकाणी डोंगराची माती रस्त्यावर आल्याने रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आणि सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून माणगाव, रोहा, तळा, पाली, महाड, पोलादपूर तालुक्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली.
महाड तालुक्यातून वाहणाऱ्या सावित्री, गांधारी व काळ या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने महाड नगर परिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. दासगाव विभागात नागरिकांमध्ये पुराच्या शक्यतेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. शहरातील सुकटगल्ली, दस्तुरी नाका ते नातेखिंड या सखल भागातील रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतूक व सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
दरम्यान, पावसाचा मोठा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला मंगळवारी बसला. या मार्गावरील ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेतील बांधकामे वाहनचालक व प्रवासी वर्गाला अडथळा ठरत आहेत. पाणी तुंबल्याने महामार्गावरील वाहतूक मंदगतीने सुरू आहे.
कशेडी घाटात दरड कोसळली मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत बोगद्यापासून २०० मीटर अंतरावर मंगळवारी दरड कोसळली. त्यामुळे वाहतुकीला खोळंबा झाला. त्यानंतर मुंबई दिशेने जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेवरून सुरू हाेती. महामार्ग प्रशासन व शिंदे डेव्हलपर्स कंपनीकडून दरड हटविण्याचे काम सुरू होते.