राणीच्या बागेची ओढ कायम
By Admin | Updated: May 12, 2014 06:08 IST2014-05-12T05:57:52+5:302014-05-12T06:08:53+5:30
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेतील प्राण्यांची संख्या एकीकडे घटत असली तरी पर्यटकांच्या संख्येत मात्र घट होताना दिसत नाही.

राणीच्या बागेची ओढ कायम
विकासकामेही जोरात : १२ लाख पर्यटकांनी दिली भेट
चेतन ननावरे, मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेतील प्राण्यांची संख्या एकीकडे घटत असली तरी पर्यटकांच्या संख्येत मात्र घट होताना दिसत नाही. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ दरम्यान राणीबागेतील विकास कामांच्या पहिल्या टप्प्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून सुमारे १२ लाख २६ हजार ६७६ पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला टप्पा पूर्णत्वाकडे येत असतानाच दुसर्या टप्प्यातील बहुतांशा विकासकामांना केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. शिवाय गेल्या वर्षभरात राणीबागेतून मुंबई महानगरपालिकेला ६६ लाख, १४ हजार ०३२ रुपये इतका महसूल मिळाला आहे. याआधी राणीबाग ‘पुरातन वास्तू श्रेणी २(ब)’ म्हणून घोषित केली आहे. शिवाय प्राणिसंग्रहालय आधुनिकीकरणाच्या सुधारित आराखड्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने ५ डिसेंबर २०१२ रोजी अंतिम मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात प्राण्यांच्या आवास स्थानांची संकल्पचित्रे नवी दिल्लीतील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. तर दुसर्या टप्प्यात सर्व प्राणी व पक्ष्यांकरिता पिंजरे बांधण्यात येणार आहेत. अस्वल, कोल्हा, लांडगा, पाणमांजर, मद्रास पॉड कासव यांच्या संकल्पचित्रांना प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली तर वाघ, बाराशिंगा, तरस, लहान मांजर संकुल व पक्ष्यांच्या एका पिंजर्याच्या संकल्पचित्राला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च १५० कोटी रुपये असून विकासकामे जुलै २०१५ रोजी पूर्ण करायची आहेत. एंट्री प्लाझासाठी सुमारे १४ कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. प्रौढ पर्यटकांची पसंती च्राणीबागेला वर्षभरात सुमारे १२ लाख २६ हजार ६७६ पर्यटकांनी भेट दिली. त्यात १० लाख ४१ हजार ९४७ प्रौढ पर्यटक तर १ लाख ८४ हजार ७२९ लहान मुलांचा समावेश आहे. घटत्या प्राण्यांच्या संख्येनंतरही प्रौढ पर्यटकांची पसंती राणीबागेला असल्याचे प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. संग्रह ५१० प्राणी व पक्ष्यांचा च्सध्या राणीबागेत एकूण १६ जातींचे १४० सस्तन प्राणी, ३१ जातींचे ३३८ पक्षी आणि ६ जातींचे ३२ सरपटणारे प्राणी व जलचर प्राणी असे एकूण ५१० प्राणी व पक्षी आहेत.