जीटीआय बंदर व्यवस्थापनाविरोधात निदर्शने; उग्र आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:58 IST2020-06-29T23:57:55+5:302020-06-29T23:58:07+5:30
चिनी कंपनीला देण्यात आलेला ठेका रद्द करण्याची कामगार संघटनेची मागणी

जीटीआय बंदर व्यवस्थापनाविरोधात निदर्शने; उग्र आंदोलनाचा इशारा
उरण : जीटीआय बंदर व्यवस्थापनाने झेडपीएमसी इंजिनीअरिंग प्रा.लिमिटेड या चिनी कंपनीला दिलेले कंत्राट तत्काळ रद्द न केल्यास उरणमधील सर्वपक्षीय समित्या आणि विविध कामगार संघटनांच्या वतीने उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा कामगार नेते महेंद्र घरत यांनी सोमवारी आयोजित निषेध सभेतून दिला.
देशाविरुद्ध कट-कारस्थान करणाऱ्या चीनचा निषेध करण्यासाठी जीटीआय कंपनीमध्ये झेडपीएमसी इंजिनीअरिंग प्रा.लिमिटेड या चिनी कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी २९ जून रोजी मेरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. जेएनपीटी बंदराच्या ओडीसी गेटसमोर कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कामगार संघटना आणि कामगारांद्वारे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना कामगार नेते महेंद्र घरत यांनी चीनधार्जिण्या जीटीआय व्यवस्थापनाविरोधात जोरदार टीका केली.
सारा देश चीनवर बहिष्कार टाकीत निषेध करण्यात गुंतला आहे. याउलट जीटीआय व्यवस्थापन चीनशी जवळीक साधून बंदरातील कामांचा ठेका चिनी कंपनीला देण्यात अधिक रस घेत आहे. झेडपीएमसी इंजिनीअरिंग प्रा.लिमिटेड या चिनी कंपनीला देण्यात आलेला ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी अनेकदा जीटीआय व्यवस्थापनाशी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, चिनी कंपनीला देण्यात आलेला ठेका रद्द करण्यास जीटीआयला स्वारस्य नाही. यापुढे जीटीआय व्यवस्थापनाचे देशविरोधी धोरण चालू दिले जाणार नाही, असा इशारा दिला, तसेच याप्रसंगी कामगार संघटनेचे पी.के.रमण, वैभव पाटील, संजय ठाकूर, आदिनाथ भोईर आदी पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.