हायवे रुंदीकरणात पोपटाची पिल्ले बेघर झाली; उपस्थितांची मने हळहळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 15:14 IST2020-02-20T15:13:24+5:302020-02-20T15:14:24+5:30
मुंबई पुणे जुन्या हायवेलगत जांभळाचे झाड बऱ्याच वर्षांपासून होते. हे झाड रुंदीकरणाच्या कामासाठी तोडण्यात आले.

हायवे रुंदीकरणात पोपटाची पिल्ले बेघर झाली; उपस्थितांची मने हळहळली
लोणावळा : विकासाच्या नावाखाली जंगलेच्या जंगले नष्ट होऊ लागली आहेत. शहरांमध्ये एखादे झाड असले तर त्यावर सर्व पक्षी घरोबा करतात. मात्र, हीच झाडे जेव्हा तोडली जातात तेव्हा त्यांच्यावर राहणाऱ्या पक्ष्यांचे घरटेच उद्ध्वस्त होते. असाच प्रकार मुंबईपुणे हायवे रुंदीकरणावेळी घडला आहे.
मुंबईपुणे जुन्या हायवेलगत जांभळाचे झाड बऱ्याच वर्षांपासून होते. हे झाड रुंदीकरणाच्या कामासाठी तोडण्यात आले. मात्र, या झाडाच्या ढोलीमध्ये पोपटाचे घर होते आणि महत्वाचे म्हणजे त्या ढोलीमध्ये 18 नुकतीच जन्मलेली पिल्ले होती. काही पिल्लांवर पिसेही आलेली नव्हती. झाड तोडताच उपस्थितांना ही पिल्ले तडफडताना दिसली. त्यांच्या आक्रोशाच्या आवाजाने त्यांचे मन हेलावले. स्थानिकांनी ती पिल्ले वाचविण्याचा आटोकाट प्रयत्नही केला. मात्र, त्यांना यश आले नाही.
जांभळाच्या ढोलीत असलेल्या 18 पैकी 11 पिल्लांनी प्राण सोडला होता. तर सातच पिल्लांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. या रेस्क्यूमध्ये दिनेश ओसवाल, अमोल कदम, अशोक मेस्त्री, हनिफ कर्जीकर, गुरुनाथ साठेलकर यांनी मदत केली. जांभळाच्या पाल्याचा बिछाना एका बास्केटमध्ये करण्यात आला. त्यामध्ये ही वाचलेली पिल्ले ठेवण्यात आली. यावेळी वनखात्याचे धाकवळ हे अधिकारीही उपस्थित होते.
या पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी शिवदूर्ग रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड यांच्याकडे देण्यात येणार आहे. रीतसर पंचनामा करून वनखाते ही पिल्ले गायकवाड यांच्या ताब्यात देतील.
शरद पवारांनाच समन्स बजावा; कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे मागणी
सर्वधर्म समभाव! 33 वर्षीय मुस्लिम तरुण बनला लिंगायत मठाचा पुजारी