पनवेल : फलाटावर झोपलेल्या चिमुकलीवर अत्याचार, एकाला अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 2, 2023 18:39 IST2023-03-02T18:38:11+5:302023-03-02T18:39:01+5:30

पनवेल रेल्वे स्थानकात घडली घटना 

Panvel A minor child sleeping on the platform was molested one arrested night time | पनवेल : फलाटावर झोपलेल्या चिमुकलीवर अत्याचार, एकाला अटक

पनवेल : फलाटावर झोपलेल्या चिमुकलीवर अत्याचार, एकाला अटक

पनवेल रेल्वे स्थानकात फलाटावर झोपलेल्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून तो कळंबोली पुलाखाली राहणारा बेघर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मुलीची आई लघुशंकेसाठी गेली असता काही मिनिटाच्या अवधीत तिच्या मुलीसोबत हे कृत्य घडले. 

मूळची जळगावची महिला रेल्वेने प्रवास करत असताना चुकून पनवेल स्थानकात आली होती. यामुळे रात्र काढण्यासाठी ती तिच्या तीन वर्षाच्या मुलीसोबत फलाट क्रमांक एकवर झोपली होती. मध्यरात्री तीनच्या सुमारास ती लघुशंकेसाठी गेली असता त्याठिकाणी मुलगी एकटीच झोपली होती. याच संधीचा फायदा घेत त्याठिकाणी आलेल्या एका व्यक्तीने तिला उचलून स्थानकाच्या वाढीव बांधकामाच्या आडोश्याला नेले. त्याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार करून पळ काढला होता. दरम्यान पीडित मुलीची आई काही वेळात फलाटावर आली असता मुलगी दिसून आली नाही. यामुळे तिने रेल्वे पोलिसांना कळवले होते. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी परिसरात शोधाशोध केली असता ती निर्वस्त्र व बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

यामुळे तिला रुग्णालयात दाखल करून पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी विविध पथके तयार केली होती. तसेच संशयित व्यक्तीची माहिती सर्व स्थानकावर उपस्थित रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना देण्यात आली होती. त्यानुसार दुपारच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आनंदकुमार यांनी जुईनगर स्थानकातून एका संशयिताला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याचे नाव मुकेशकुमार बाबू साह (३०) असून त्यानेच पीडितेवर अत्याचार केल्याची कबुली दिली. तो कळंबोली पुलाखाली राहणारा असून रात्रीच्या वेळी सर्वत्र भटकत असतो. त्याच्या या कृत्याने रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकात गुन्हेगारांचा शिरकाव होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान त्याने यापूर्वी देखील अशी काही कृत्ये केली आहेत का याचा अधिक तपास पनवेल रेल्वे पोलीस करत आहेत.

Web Title: Panvel A minor child sleeping on the platform was molested one arrested night time