जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:57 AM2021-04-23T00:57:54+5:302021-04-23T00:58:04+5:30

केंद्राची मान्यता : २७२ बेड्सना होणार पुरवठा; काम सुरू

Oxygen generation plant will be set up in the district hospital | जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणार

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणार

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधितांचे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील बेड व्यवस्था अपुरी पडली आहे. सुदैवाने रुग्णांना आवश्यक असणारा प्राणवायूचा पुरवठा मुबलक आहे. या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये आता अधिक वाढ होणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी केंद्राने मान्यता दिली आहे. ४० लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या प्लांटमुळे रुग्णालयात प्राणवायूची गरज असणाऱ्या २७२ बेड्सना ऑक्सिजन पुरवठा होणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे ऑक्सिजन पुरवठा नियमित आणि सुरळीत सुरू आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाला १८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भागविली जाईल इतका ऑक्सिजन साठा मिळतो 
आहे. 
जिल्ह्यातील खोपोली आणि महाड येथील कंपन्यांमधून ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलिंडर मागणीनुसार उपलब्ध होत आहेत. हा ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना बेड जवळ सिलिंडर नेऊन दिला जातो. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या एक ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. हा ऑक्सिजन पुरवठा थेट पाइपलाइनद्वारे रुग्णांच्या बेडपर्यंत नेण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांची होणारी वाढ आणि ऑक्सिजनची गरज पाहता केंद्र सरकारने जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यास मान्यता दिली आहे. राष्ट्रीय आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या आवारात हा प्लांट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

केंद्राकडून प्राप्त झालेल्या निधीतून २ एअर ड्रायर मशीन , २ स्टोरेज टॅंक आणि १ एअर रिसिव्हर टॅंक मशीन रुग्णालयात दाखल झाली आहे. ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी अपेक्षित असणारी साधनसामग्री मागविण्यात आली आहे. तज्ज्ञ अभियंता वर्ग या प्लॅन्टचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधून ४० जम्बो सिलिंडर ऑक्सिजननिर्मिती केली जाणार आहे. ३०० एलपीएम ऑक्सिजन साठा या ऑक्सिजन प्लांटमधून केला जाणार आहे.

जिल्हा रुग्णालयास आवश्यक असणारी ऑक्सिजनची गरज भागविण्याइतका ऑक्सिजन साठा रुग्णालयात शिल्लक आहे. काही ऑक्सिजन प्लांटमधून निर्मित केला जातो. काही ऑक्सिजन खोपोली आणि महाड येथून येत आहे. नव्याने सुरू होणाऱ्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधून जिल्हा रुग्णालयाच्या गरजेपेक्षा अधिक ऑक्सिजन तयार केला जाणार आहे. लवकरच हा प्लांट पूर्णत्वास येऊन सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक
 

Web Title: Oxygen generation plant will be set up in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.