महाडमधील रेवतळे-नागेश्वर नदीवरील जुना पूल धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:56 IST2019-07-13T23:42:13+5:302019-07-14T06:56:40+5:30
महाड तालुक्यातील रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शेट यांनी प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिले आहे.

महाडमधील रेवतळे-नागेश्वर नदीवरील जुना पूल धोकादायक
बिरवाडी : महाड तालुक्यातील रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शेट यांनी प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिले आहे. ग्रामपंचायत रेवतळे सरपंच किशोर शेट यांनी दिलेल्या पत्रानुसार महाड ते रेवतळे मार्गे मंडणगड खेड व दापोली हा मुख्य वाहतुकीचा रस्ता आहे. या मार्गावर रेवतळे येथील नागेश्वरी नदीवर असणारा पूल कालबाह्य व नादुरुस्त झाला आहे. या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा चालू आहे.
पुलाची उंची कमी असल्याने तो पावसाळ्याच्या दिवसात वारंवार पाण्याखाली असतो, त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना तासन्तास थांबावे लागत असल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा होतो, त्यामुळे पुढील गावाचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा संपर्क तुटतो. पूल कालबाह्य व नादुरुस्त असल्याने केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते, अशी भीती लेखी निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
हा पूल आंबिवली येथील धरणक्षेत्राच्या पाण्याखाली जात असल्याने या पुलाला पर्याय म्हणून नवीन पूल बांधण्यात येत आहे; परंतु या नवीन पुलाचे बांधकाम रखडल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. जुन्या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याकरिता तातडीने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत, माहिती व योग्य कारवाईकरिता तहसीलदार महाड उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड स्थानिक आमदार भरत गोगावले यांना देण्यात आली आहे.
>नवीन पुलाचे काम रखडले
नवीन पुलाचे बांधकाम रखडल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुन्या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याकरिता तातडीने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.